खर्डा २२ऑगस्ट २०२६
जामखेड तालुक्यातील खर्डा हद्दीतील मोहरी येथे एक गुंठा जागेच्या व्यवहारातील वादातून २७ वर्षीय युवकाला लाथाबुक्क्यांनी, दगडाने व लाकडी काठीने मारहाण केल्याची घटना मोहरी (ता. जामखेड) येथील बसस्थानक परिसरात दिनांक १६ ऑगस्ट रोजी दुपारी साडेदोनच्या सुमारास घडल्याची तक्रार जखमी युवकाने दिली आहे.
या मारहाणीत युवकाच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली असून, एक्स-रे तपासणीत दोन्ही पायांना फ्रॅक्चर असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याचे तक्रारीत नमूद आहे.
याबाबत अंकुश बलधिभम कांबळे (वय २७, रा. मोहरी, ता. जामखेड) यांनी खर्डा पोलिसांकडे दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, मोहरी येथील अशोक केरबा मासाळ यांची एक गुंठा जागा त्यांचे मामा बाळू दिगंबर मासाळ यांनी काही वर्षांपूर्वी २० हजार रुपयांना घेतली होती. मात्र, सदर जागा मामाच्या नावावर करून देण्यासाठी संबंधित व्यक्तीकडून एक लाख रुपयांची मागणी होत असल्याने वाद निर्माण झाला होता.
या व्यवहारावरून मामा बाळू मासाळ यांना अंकुश व त्यांचे वडील अधिक पैसे देण्यास सांगत असल्याचा संशय असल्याचे तक्रारीत नमूद आहे. याच कारणावरून बाळू मासाळ हे शिवीगाळ करीत असल्याचेही जबाबात म्हटले आहे.
१६ ऑगस्ट रोजी दुपारी साडेदोनच्या सुमारास अंकुश हे मोहरी बसस्थानकावर उभे असताना त्यांचे मामा बाळू मासाळ तेथे आले. त्यांनी वडील कुठे गेले आहेत, अशी विचारणा केली. यावेळी जागेच्या व्यवहारावरून वाद झाला. त्यानंतर शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत खाली पाडले. खाली पडल्यानंतर दगडाने दोन्ही पायांवर मारहाण केली तसेच लाकडी काठीने डोक्यावर मारून जखमी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
