खर्डा:३ सप्टेंबर २०२६
जामखेड तालुक्यातील बालाघाट डोंगररांगेच्या कुशीत वसलेल्या मोहरी-कुरण परिसरात बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बुधवारी दुपारी डोंगर भागात शेळ्या चारताना बिबट्याने एका शेळीवर अचानक हल्ला करून तिला जागीच ठार केले. अवघ्या आठ दिवसांत बिबट्याच्या हल्ल्याची ही दुसरी घटना असल्याने परिसरातील शेतकरी आणि पशुपालकांमध्ये कमालीची घबराट पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहरी-कुरण परिसरातील डोंगरावर राहुल हाळणावर हे दुपारी एकच्या सुमारास आपल्या शेळ्या चारत होते. त्यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक एका शेळीवर झडप घातली. हा प्रकार लक्षात येताच जवळच जनावरे चारणारे गंगाधर तोंडे, सुजित तोंडे, खालील पठाण व अन्य पशुपालकांनी तातडीने बिबट्याच्या दिशेने धाव घेत मोठा आरडाओरडा केला. ग्रामस्थांचा रोख पाहून बिबट्याने तेथून पळ काढला, मात्र तोपर्यंत शेळीचा मृत्यू झाला होता.
आठवड्याभरात दुसरा हल्ला
विशेष म्हणजे, आठ दिवसांपूर्वीच याच परिसरात अण्णा खवळे यांच्या वासरावरही बिबट्याने हल्ला चढवला होता. त्यावेळीही ग्रामस्थांनी वेळेवर केलेल्या आरडाओरड्यामुळे वासराचा जीव वाचला होता. सध्या मुसळधार पावसामुळे बालाघाटच्या डोंगर रांगांमध्ये गवत मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे पशुपालकांना जनावरे चरण्यासाठी डोंगरावर न्यावीच लागत आहेत, मात्र बिबट्याच्या सततच्या वावरामुळे ग्रामस्थांना हातात जीव धरून जनावरे चरावी लागत आहेत.
सतत होणाऱ्या हल्ल्यांमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी वनविभागाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. खर्डा आणि मोहरी-कुरण परिसर तातडीने ‘बिबटप्रवण क्षेत्र’ म्हणून जाहीर करावा, तसेच वनविभागाने तात्काळ या भागाची पाहणी करून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा, अशी जोरदार मागणी स्थानिक शेतकरी व पशुपालकांनी केली आहे.
