खर्डा (प्रतिनिधी):११ सप्टेंबर २०२६
जामखेड तालुक्यातील ऐतिहासिक खर्डा परिसर आज भरदिवसा घडलेल्या एका थरारक आणि निघृण हत्येच्या घटनेने पूर्णपणे हादरून गेला आहे. सीताराम गडाच्या पायथ्याशी अज्ञात टोळक्याने एका ४० वर्षीय तरुणाच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून त्याच्यावर कोयत्याने सपासप वार करून त्याची निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र खळबळ उडाली असून भीतीचे सावट पसरले आहे.
तानाजी भास्कर बोराडे (वय ४०, रा. माळीवाडा, ता. भूम) असे या हत्येत दुर्दैवी मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
स्कुटीवरून आलेल्या टोळक्याचा थरार
मिळालेल्या माहितीनुसार, आज ११ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास तानाजी बोराडे हे सीताराम गडाच्या पायथ्याशी असताना स्कुटीवरून आलेल्या ३ ते ४ जणांच्या टोळक्याने त्यांना गाठले. काही समजण्याच्या आतच हल्खोरांनी आधी त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली. बोराडे हे असहाय्य होताच हल्खोरांनी त्यांच्यावर कोयत्याने प्राणघातक आणि धारदार वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पाडून हल्खोर घटनास्थळावरून पसार झाले.
रुग्णालयात नेताना वाटेतच प्राणज्योत मालवली
घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिकेसह डॉ. लाड तात्काळ घटनास्थळी पोहोचले. अत्यंत गंभीर अवस्थेत असलेल्या तानाजी बोराडे यांना जामखेड येथील रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन जात असताना, दुर्दैवाने दरडवाडी कॉर्नर येथेच वाटेत त्यांचा मृत्यू झाला.
घटनास्थळी आणि परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली असून खरडा पोलीस तातडीने दाखल झाले आहेत. हत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून खर्डा पोलीस आरोपींचा शोध आणि पुढील तपास वेगाने करत आहेत.
