अहिल्यानगर:११ अक्टूबर २०२६
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अहिल्यानगर पोलीस दलातर्फे दिनांक ९ ऑक्टोबर रोजी रात्री ११ ते १० ऑक्टोबर रोजी पहाटे ५ या वेळेत विशेष ‘ऑपरेशन ऑल आऊट’ राबविण्यात आले. पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात ही धडक मोहीम राबवण्यात आली.
या मोहिमेत जिल्हयातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, तसेच ५७ पोलीस अधिकारी, २०७ पोलीस अंमलदार आणि १०१ होमगार्ड सहभागी झाले होते.
संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी करून एकूण १,१३६ वाहनांची तपासणी करण्यात आली. यादरम्यान वाहतूक नियम मोडणाऱ्या २२६ जणांवर केसेस करण्यात आल्या, तर मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या (ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह) १२ जणांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली.
सराईত गुन्हेगार व वॉरंट तज्ज्ञांची तपासणी: पोलिसांनी १५९ सराईत गुन्हेगारांची तपासणी केली. तसेच, हद्दपार केलेल्या ५० आरोपींची पडताळणी करण्यात आली असून, कोर्टाचे ८२ नॉन बेलेबल वॉरंट बजावण्यात आले.
अवैध धंद्यांवर कारवाई करत २३ ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. तसेच २५५ हॉटेल्स आणि लॉजिंगची कसून तपासणी करण्यात आली. पोलीस अभिलेखावरील २० फरार आरोपी आणि ३६ पाहिजे असलेल्या आरोपींना शोधून कारवाई करण्यात आली.
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक मुमका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनच्या अधिकारी व अंमलदारांनी यशस्वीरीत्या पार पाडली. या मोहिमेमुळे गुन्हेगारी वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
