जामखेड़(विशेष प्रतिनिधी):२७ सप्टेंबर २०२६
जामखेड तालुक्यातील भूतवडा येथे घरात घुसून माय-लेकाला लोखंडी रॉडने मारहाण करत जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन मुख्य आरोपींसह चोरीचा माल बाळगणाऱ्या दोन जणांना ताब्यात घेतले असून १ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे जबरी चोरीसह घरफोडीचा आणखी एक गुन्हा उघडकीस आला आहे.
नेमकी काय घडली होती घटना?
दिनांक ११ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री २:०० वाजेच्या सुमारास भूतवडा (ता. जामखेड) येथील रहिवासी सुरेश जालींदर डोके (वय ३३) यांच्या घरात चार अनोळखी चोरट्यांनी प्रवेश केला. चोरट्यांनी सुरेश डोके आणि त्यांच्या आईला लोखंडी रॉडने बेदम मारहाण करत गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आणि घरातील रोख रक्कम जबरीने चोरून नेली होती. या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा (गु.र.नं. ५४९/२०२६, BNS कलम ३०९(६)) दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पोउपनि विकास जाधव आणि पथकाला तपासासाठी रवाना केले.
तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पथकाने २४ तासांच्या आत माग काढून संशयित आरोपी किरण गोविंद चव्हाण (वय १९) आणि अनिल गौतम काळे (वय १८) (दोघे रा. मिलिंदनगर, जामखेड) यांना ताब्यात घेतले.
कडक चौकशीदरम्यान त्यांनी आपल्या फरार साथीदारांच्या मदतीने ही जबरी चोरी केल्याची कबुली दिली.
तसेच आरोपी किरण चव्हाण याने त्याच्या साथीदारासह कृष्णा भोसले यांच्या घरी चोरी केल्याचेही मान्य केले, ज्यामुळे जामखेड पोलीस ठाण्यातील घरफोडीचा दुसरा गुन्हा (गु.र.नं. ५५०/२०२६) उघडकीस आला.
आरोपींनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी चोरीचे सोन्याचे दागिने खरेदी-विक्री व्यवहारात सहभागी असलेल्या परवेज अझहर सय्यद (वय ४१) आणि किरण उर्फ दादा शंकर काळे (वय ३०) यांना ताब्यात घेतले.
तपासादरम्यान सोमनाथ झुंबर खवळे याच्याकडून ९०,००० रुपये किमतीचे ६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले. तसेच आरोपीच्या घरातून २०,००० रुपयांचे दोन मोबाईल फोन असा एकूण १ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या गुन्ह्यात सहभागी असलेले खालील ५ आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत:
१. किरण रावसाहेब काळे
२. रोहित अशोक काळे
३. कोहिनूर दिपक काळे (तिघे रा. मिलिंदनगर, जामखेड)
४. ओमकार फुलचंद काळे (रा. गुरेवाडी, ता. जामखेड)
५. करण अशोक पवार (रा. भूतवडा रोड, जामखेड)
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि विकास जाधव, पोलीस अंमलदार फुरकान शेख, शामसुंदर जाधव, रोहित मिसाळ, प्रताप देवकाते, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर, मनोज साखरे आणि अरुण मोरे यांच्या पथकाने केली. आरोपींना मुद्देमालासह पुढील तपासासाठी जामखेड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
