जामखेड (प्रतिनिधी):२सप्टेंबर २०२६
स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगरच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे जामखेड येथील सदाफुले वस्ती, कुरेशी मोहल्ला येथे छापा टाकून कत्तलीच्या उद्देशाने बेकायदेशीरपणे डांबून ठेवलेल्या ५ गोवंशीय जनावरांची सुटका केली. या कारवाईत ३ लाख रुपये किमतीच्या ३ गायी आणि इतर जनावरे हस्तगत करण्यात आली असून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध गोवंश वाहतूक व कत्तल करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली अरूण गांगुर्डे, मनोज साखरे, भाऊसाहेब काळे, रोहित मिसाळ आणि दिपक जाधव यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ रोजी जामखेड परिसरात गस्त घालत असताना, जमीर कुरेशी याच्या घरामागील मोकळ्या जागेत जनावरे कत्तलीसाठी बांधून ठेवल्याची बातमी पथकाला मिळाली. पंचांसमक्ष टाकलेल्या छाप्यात मोहंमद साद कुरेशी (वय १९, रा. सदाफुले वस्ती, जामखेड) यास ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी आरोपींविरुद्ध जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ६०४/२०२६ नुसार महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम (सुधारित २०१५) चे कलम ५(ब), ९ सह प्राण्यांना निर्दयतेने वागवण्यास प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जामखेड पोलीस करत आहेत
