खर्डा / प्रतिनिधी: १ सप्टेंबर २०२६
अवघ्या एका वर्षाचा चिमुकला हृदय अक्षय दरेकर सध्या एका अत्यंत गंभीर आणि दुर्मिळ आजाराशी लढा देत आहे. हृदयला SMA Type 1 (Spinal Muscular Atrophy) हा दुर्मिळ जनुकीय आजार झाला असून, यामुळे त्याच्या शरीराचे स्नायू हळूहळू कमकुवत होत आहेत. या चिमुकल्याचे प्राण वाचवण्यासाठी आणि त्याला सामान्य आयुष्य मिळवून देण्यासाठी एका अत्यंत महागड्या उपचाराची नितांत गरज आहे.
या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएशन (महाराष्ट्र राज्य) अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते रविराज साबळे तसेच दरेकर कुटुंबाने सर्वसामान्य जनतेला सढळ हाताने आर्थिक मदत करण्याचे भावुक आवाहन केले आहे.
या संकटसमयी चिमुकल्याच्या पाठीशी उभे राहत ‘पोलीस वारंट’च्या संपादिका श्वेता गायकवाड, पत्रकार संतोष थोरात, A१ मोबाईल शॉपचे संचालक आशुतोष गायकवाड, भाजपा खर्डा शहर प्रमुख सोनाजी सुरवासे, अमित मदने, संकेत पवार, पृथ्वी चव्हाण, अरियन जावळे, अक्षय वाळुंजकर,सनी पगारे आणि शंकर जावळे यांच्यासह स्थानिक तरुण वर्ग मोठ्या संख्येने पुढे आला असून त्यांनी रविराज साबळे यांच्या या आवाहनाला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे.
काय आहे ‘SMA Type 1’ आणि उपचार?
SMA Type 1 हा अत्यंत दुर्मिळ आणि धोकादायक आजार मानला जातो. यावर ‘Zolgensma’ (झोलगेन्समा) हे एकमेव प्रभावी इंजेक्शन उपलब्ध आहे. परंतु, या जीवनदायी इंजेक्शनची किंमत तब्बल १० कोटी रुपये आहे. एका सामान्य कुटुंबासाठी एवढी मोठी रक्कम उभी करणे अत्यंत कठीण असल्याने समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीची नितांत गरज आहे.
हृदयाच्या उपचाराचा खर्च अथांग असल्याने सामान्य कुटुंबासाठी हा भार पेलणे अशक्य झाले होते. ही बाब लक्षात घेऊन रविराज साबळे यांनी पुढाकार घेत मदतफेरी व निधी संकलनाचे काम वेगाने सुरू केले आहे.
या सामाजिक उपक्रमाची दखल घेत तालुक्यातील पत्रकारांनी चिमुकल्या हृदयाची स्थिती व मदतीचे आवाहन वृत्तपत्रे, न्यूज पोर्टल आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे या अभियानाला मोठी पारदर्शकता आणि व्यापकता मिळाली आहे.
दुसरीकडे, स्थानिक तरुणाईने मैदानी पातळीवर उतरून या मोहिमेची धुरा सांभाळली आहे. ऑनलाईन निधी संकलन, क्यूआर कोडचा प्रसार, सोशल मीडिया मोहीम आणि प्रत्यक्ष घरोघरी जाऊन मदतीचे आवाहन करण्यात युवक अग्रेसर आहेत.
“चिमुकल्या हृदयाचे प्राण वाचवणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. पत्रकार आणि युवकांनी दाखवलेली ही सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद असून, सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे आपण लवकरात लवकर आवश्यक तो निधी उभारू,” असा विश्वास सामाजिक कार्यकर्ते रविराज साबळे यांनी व्यक्त केला.
पत्रकार आणि तरुणाईची ही ऊर्जा एकत्र आल्यामुळे या मदतकार्याला मोठी गती मिळाली असून, नागरिकांनीही या मोहिमेत मोकळ्या हाताने आर्थिक मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
