अहिल्यानगर (प्रतिनिधी): ६ सेंप्टेंबर २०२६
अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मोठी कारवाई केली आहे. मिरजगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सीना नदीपात्रातून विनापरवाना अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून टेम्पो व वाळूसह तब्बल ८ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा व वाहतुकीवर कडक कारवाई करण्याचे आदेश अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिले होते. या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पोलीस अंमलदार शामसुंदर जाधव, भाऊसाहेब काळे व रोहित मिसाळ यांचे विशेष पथक तयार करून कारवाईसाठी रवाना केले होते.
सीना नदीपात्रात छापा
शनिवारी (दि. ५ सप्टेंबर २०२६) हे पथक मिरजगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना गोपनीय बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की, नागलवाडी (ता. कर्जत) गावच्या शिवारात सीना नदीपात्रात एका टाटा टेम्पोमध्ये अवैध वाळू भरली जात आहे. माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचासमक्ष घटनास्थळी छापा टाकला असता, एक इसम टेम्पोमध्ये वाळू भरताना रंगेहात पकडला गेला.
पोलीस पथकाने महेंद्र सदाशिव डाडर (वय ३८, रा. नागलवाडी, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) याला ताब्यात घेतले. वाळू वाहतुकीच्या परवान्याबाबत विचारपूस केली असता, त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे उघडकीस आले. या कारवाईत पोलिसांनी ८ लाख रुपये किंमतीचा विनाक्रमांकाचा टाटा टेम्पो आणि १० हजार रुपये किंमतीची वाळू असा एकूण ८ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी मिरजगाव पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल (गु.र.नं. ३४७/२०२६) करण्यात आला असून, पुढील तपास मिरजगाव पोलीस ठाणे करत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
