जामखेड:११ सप्टेंबर २०२६
चौंडी (ता. जामखेड) येथे कार्यक्रमादरम्यान गर्दीचा फायदा घेऊन सोन्याची साखळी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला जेरबंद करण्यात अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी २ लाख ४० हजार रुपयांची सोन्याची लगड जप्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३१ मे २०२६ रोजी बारामती येथील नवनाथ विष्णू पडळकर (वय ५१) हे चौंडी येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी अज्ञातांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी आणि पेंडल गर्दीचा फायदा घेऊन लांबवले होते. याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास सुरू केला. गुपितातून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी राम अर्जुन मुरकुटे (वय ३१, रा. मुर्शदपूर, ता. आष्टी, जि. बीड) यास ताब्यात घेतले.
कडक चौकशी केली असता, त्याने आपल्या इतर दोन साथीदारांच्या सहकार्याने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. चोरी केलेले सोने त्याने बीड येथील एका सोनाराला विकले होते. पोलिसांनी संबंधित सोनाराकडून २ लाख ४० हजार रुपये किमतीची १६ ग्रॅम सोन्याची लगड पंचांसमक्ष जप्त केली आहे.
या गुन्ह्यात सोमीनाथ कैलास कुसळकर आणि लखन अर्जुन मुरकुटे (दोघे रा. मुर्शदपूर, ता. आष्टी, जि. बीड) हे दोघे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पकडण्यात आलेला आरोपी राम मुरकुटे याच्यावर यापूर्वीही शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पुढील तपासासाठी आरोपीला जामखेड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार शामसुंदर जाधव, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर आणि अमोल आजबे यांच्या पथकाने केली.
