खर्डा (प्रतिनिधी): ११ सप्टेंबर २०२६
जामखेड तालुक्यातील ऐतिहासिक खर्डा परिसर आज भरदिवसा घडलेल्या एका थरारक आणि निघृण हत्येच्या घटनेने पूर्णपणे हादरून गेला आहे. सीताराम गडाच्या पायथ्याशी अज्ञात टोळक्याने एका ४० वर्षीय तरुणाच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून त्याच्यावर कोयत्याने सपासप वार करून त्याची निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र खळबळ उडाली असून भीतीचे सावट पसरले आहे.
तानाजी भास्कर बोराडे (वय ४०, रा. माळीवाडा, ता. भूम) असे या हत्येत दुर्दैवी मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
स्कुटीवरून आलेल्या टोळक्याचा थरार
मिळालेल्या माहितीनुसार, आज ११ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास तानाजी बोराडे हे सीताराम गडाच्या पायथ्याशी असताना स्कुटीवरून आलेल्या ३ जणांच्या टोळक्याने त्यांना गाठले. काही समजण्याच्या आतच हल्खोरांनी आधी त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली. बोराडे हे असहाय्य होताच हल्खोरांनी त्यांच्यावर कोयत्याने प्राणघातक वार केले. रक्ताच्या थारोळ्यात सोडून हल्खोर घटनास्थळावरून पसार झाले.
रुग्णालयात नेताना वाटेतच प्राणज्योत मालवली
घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिकेसह डॉ. लाड तात्काळ घटनास्थळी पोहोचले. अत्यंत गंभीर अवस्थेत असलेल्या तानाजी बोराडे यांना जामखेड येथील रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन जात असताना, दुर्दैवाने दरडवाडी कॉर्नर येथे वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.
एलसीबी (LCB) आणि खर्डा पोलिसांची संयुक्त कारवाई: एका आरोपीचे नाव निष्पन्न
या घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि खर्डा पोलिसांनी तातडीने संयुक्त कारवाई करत तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. या कारवाईत ३ ते ४ अज्ञात आरोपींपैकी एक फरार आरोपीची ओळख पटली आहे. एक अल्पवयीन आरोपी(रा. नळी वडगाव, ता. भूम) असे निष्पन्न झाला आहे.
इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली असून खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वलसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास वेगाने सुरू आहे. लवकरच आरोपींच्या मुसक्या आवळणार, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वलसिंह राजपूत यांनी दिली आहे.
