जामखेड प्रतिनिधी : १९ सप्टेंबर २०२६
जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शनिवारच्या आठवडे बाजारात आज (दि. १९ सप्टेंबर) एका बैलाची तब्बल १ लाख ७१ हजार रुपये किमतीला विक्री झाली. गितेवाडी, ता. पाटोदा, जि. बीड येथील संतोष फुंदे यांनी हा बैल खरेदी केला असून, रायमोहा, ता. पाटोदा, जि. बीड येथील अल्ताफ पठाण यांनी बैलाची विक्री केली.
जामखेडचा आठवडे बाजार हा परिसरातील नामांकित पशुधन बाजार म्हणून ओळखला जातो. जामखेड हे बीड, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागाच्या जवळ असल्याने बाजारात विविध भागांतून मोठ्या प्रमाणात जनावरे दाखल होतात.
सांगोला, पंढरपूर, सांगली यांसह विविध भागांतून बैल, गायी व इतर जनावरे तसेच शेळी-मेंढ्यांची आवक होत असते. त्यामुळे आठवडे बाजाराच्या दिवशी परिसरात मोठी व्यापारी व शेतकरी गर्दी पाहायला मिळते. विशेष म्हणजे कर्नाटक राज्यातूनही शेळीचे व्यापारी जामखेड बाजारात येऊन खरेदी-विक्री करतात.
पशुधनाच्या दर्जानुसार मिळणारा भाव, विविध जिल्ह्यांतील शेतकरी व व्यापाऱ्यांची उपस्थिती आणि वाढती उलाढाल यामुळे जामखेडच्या आठवडे बाजाराला पशुधन व्यापाराच्या दृष्टीने महत्त्व प्राप्त झाले आहे. आज झालेल्या १ लाख ७१ हजार रुपयांच्या बैलाच्या विक्रीमुळे पशुधन बाजारातील वाढती मागणी दिसून आली.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पै. शरद कार्ले, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भगवान मुरूमकर, उपसभापती नंदकुमार गोरे व संचालक मंडळ सचिव दिलीप तिजोरे यांच्यासह शेतकरी, व्यापारी व पशुपालक उपस्थित होते.
