अहिल्यानगर:१९ सप्टेंबर २०२६
घरगुती वापराच्या गॅस टाक्यांमधून कमर्शियल टाक्यांमध्ये बेकायदेशीरपणे गॅस रिफिलिंग करून काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही मोठी कारवाई करण्यात आली असून, पोलिसांनी २१ लाख ८० हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह १३३ गॅस टाक्या आणि वाहने जप्त केली आहेत.
जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिले होते. त्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, प्रताप देवकाते, मनोज साखरे आणि अमोल कोतकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, दक्षात नगर (तपोवन रोड) येथे किरण संतोष गलांडे हा त्याच्या गाळ्याच्या पाठीमागील मोकळ्या जागेत विनापरवाना घरगुती गॅस टाक्यांमधून कमर्शियल टाक्यांमध्ये रिफिलिंग करून गॅसची बेकायदेशीर विक्री करत आहे.
दोन जण ताब्यात, दोन फरार
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसमक्ष घटनास्थळी छापा टाकला. तेथे इलेक्ट्रिक मोटारीच्या साह्याने वजनाच्या काट्यावर ठेवून गॅस रिफिलिंग सुरू असल्याचे आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन जणांना ताब्यात घेतले:
१) कल्ला रघुराज सिंग (वय २४, रा. बोल्हेगाव, अहिल्यानगर)
२) गौरव राजेंद्र आढाव (वय ३४, रा. पिंपळगाव माळवी, अहिल्यानगर)
ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे चौकशी केली असता, हा बेकायदेशीर व्यवसाय किरण संतोष गलांडे (रा. दक्षतानगर) याच्या मालकीचा असून रिफिलिंगसाठी लागणाऱ्या घरगुती टाक्या नितीन कदम (रा. पाईपलाईन रोड) याच्याकडून खरेदी केल्याचे निष्पन्न झाले. सध्या किरण गलांडे आणि नितीन कदम हे दोघे फरार आहेत.
२१ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
पोलीस पथकाने कारवाईत खालील मुद्देमाल जप्त केला आहे:
भारत गॅस: ५६ भरलेल्या घरगुती टाक्या, ४६ भरलेल्या कमर्शियल टाक्या आणि २ रिकाम्या घरगुती टाक्या.
एचपी गॅस: २३ भरलेल्या घरगुती टाक्या, ३ भरलेल्या कमर्शियल टाक्या आणि ३ रिकाम्या कमर्शियल टाक्या.
वाहने: ४ छोटा हत्ती, १ बोलेरो पिकअप आणि १ ओमिनी कार.
इतर साधने: २ इलेक्ट्रिक मोटारी, २ इलेक्ट्रिक वजन काटे, १ सील बसवणारी हिट गन मशीन, ३० गॅस टोपण व प्लास्टिक लेबल्स.
गुन्हा दाखल
ताब्यात घेतलेल्या आरोपींना आणि जप्त मुद्देमालाला तोफखाना पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. आरोपींविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२५, २८७, २८८, ३१८(४), ३३६, ३(५) सह जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ च्या कलम ३ व ७ अन्वये गुन्हा (गु.र.नं. ७९९/२०२६) दाखल करण्यात आला आहे.
सदर कामगिरी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
