पिंपरी–चिंचवड:१९ सप्टेंबर २०२६
चऱ्होली येथील पंतप्रधान आवास योजना म्हाडा इमारतीमध्ये गुरुवारी (१७ सप्टेंबर) सकाळी एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. घरात सतत बडबड करून झोपेतून उठवल्याचा राग अनावर झाल्याने नातवाने स्वतःच्या ७५ वर्षीय आजीच्या डोक्यात स्टीलचा तांब्या मारून तिची हत्या केली.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र खळबळ उडाली असून नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
माया लक्ष्मण अहिवळे (वय ७५) असे हत्या झालेल्या दुर्दैवी वृद्ध महिलेचे नाव आहे. याप्रकरणी साईनाथ नागनाथ थोरात (वय ५०, रा. चऱ्होली) यांनी दिघी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या फिर्यादीवरून त्यांचा मुलगा आणि मृत महिलेचा नातू आरोपी स्वप्नील साईनाथ थोरात (वय २५) याच्याविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
नेमका प्रकार काय घडला?
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी साईनाथ यांची सासू माया अहिवळे यांनी स्वप्नीलला घरात घाण केल्यावरून आणि तो झोपलेला असताना बडबड करून उठवल्यावरून टोकले होते. याचा प्रचंड राग स्वप्नीलच्या मनात धरला.
रागाच्या भरात त्याने आजीच्या डोक्यात स्टीलच्या तांब्याने जोरदार प्रहार केला आणि त्यांना जमिनीवर आपटले. यात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने माया अहिवळे यांचा जागीच मृत्यू झाला.
राज्यात आणि देशभरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले असून क्षुल्लक कारणांवरून होणाऱ्या हिंसक घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास दिघी पोलीस करत आहेत.
