पाथर्डी:23 September
अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) दिले होते. या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पाथर्डी परिसरात मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकून ४० लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २० सप्टेंबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पाथर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना, ‘बोरुडे मळा’ येथे जेसीबीच्या सहाय्याने डंपरमध्ये अवैध वाळू भरून वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसमक्ष घटनास्थळी छापा टाकला.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी जेसीबी चालक उमेश विष्णू कचरे (वय २२, रा. पाडळी, ता. पाथर्डी) याला जागीच ताब्यात घेतले. वाळू वाहतुकीबाबत विचारपूस केली असता, त्याच्याकडे कोणताही परवाना आढळून आला नाही. मालक नारायण बोरुडे (रा. बोरुडे मळा, पाथर्डी) याच्या सांगण्यावरून ही वाहतूक केली जात असल्याचे चालकाने कबूल केले. मालक नारायण बोरुडे हा सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
जप्त केलेला मुद्देमाल:
जेसीबी (MH-16-CV-7624): किंमत ₹२५,००,०००/-
टाटा कंपनीचा विनाक्रमांकाचा डंपर: किंमत ₹१५,००,०००/-
अवैध वाळू: किंमत ₹४०,०००/-
एकूण जप्त मुद्देमाल: ₹४०,४०,०००/-
याप्रकरणी आरोपींविरुद्ध पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक ११५१/२०२६ नुसार ‘भारतीय न्याय संहिता २०२३’ चे कलम ३०३(२), ३(५) सह पर्यावरण कायदा कलम ३ व १५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पाथर्डी पोलीस करत आहेत.
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार अरुण गांगुर्डे, रणजीत जाधव, अमोल कोतकर आणि सतीश भवर यांच्या पथकाने केली.
