अहिल्यानगर:२३ सप्टेंबर २०२६
पिंपळगाव कौडा (ता. अहिल्यानगर) येथे घडलेल्या भीषण हत्या प्रकरणातील फरार आरोपीला अवघ्या चार दिवसांत पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. हरीष गुलाब काळे (वय ३०, रा. पिंपळगाव कौडा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याला कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातून ताब्यात घेण्यात आले.
नेमकी घटना काय?
दिनांक १९ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास आरोपी हरीष काळे याच्या घरी भांडण सुरू होते. हे भांडण सोडवण्यासाठी विक्रम रोहिदास भोसले आणि त्यांचा भाऊ किरण रोहिदास भोसले (रा. पिंपळगाव कौडा) तिथे गेले. भांडण सोडवल्याचा राग आल्याने आरोपी हरीष काळे याने किरण भोसले यांच्यावर लोखंडी कत्तीने तोंड, छाती आणि पोटावर वार करून त्यांची निर्घृण हत्या केली. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात बीएनएस कलम १०३(१), ३५२, ३५१ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी तातडीने तपास पथक रवाना केले. घटनेनंतर आरोपी सतत आपले ठिकाण बदलून फरार होत होता. श्रीगोंदा, दौंड, पुणे आणि मुंबई येथे शोध घेतल्यानंतर, २३ सप्टेंबर २०२६ रोजी आरोपी कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात असल्याची गुप्त माहिती पथकाला मिळाली.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून आरोपी हरीष काळे यास कल्याण रेल्वे स्टेशनवरून ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी आरोपीला नगर तालुका पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलीस अंमलदार फुरकान शेख, शामसुंदर जाधव, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, रोहित मिसाळ, प्रताप देवकाते, दिपक जाधव आणि अरूण मोरे यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.
