जामखेड (प्रतिनिधी):२७सप्टेंबर २०२६
पैसे काढल्याच्या संशयावरून एका अपंग तरुणाला लोखंडी गजाने जबर मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना जामखेड तालुक्यातील चोभेवाडी येथे घडली आहे. या प्रकरणी चार जणांविरुद्ध जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी पीडित कुटुंबीयांकडून केली जात आहे.
नितीन चंदन काळे (वय ३०, रा. चोभेवाडी, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) असे मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून छगन बठारू काळे, शहनात छगन काळे, जावेद छगन काळे आणि किसाबाई छगन काळे (सर्व रा. चोभेवाडी, ता. जामखेड) या चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
२३ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास नितीन काळे हे त्यांच्या वडिलांच्या घरासमोर उभे असताना आरोपी तेथे आले. “तू शहनाज काळे यांच्या खिशातील पैसे का काढून घेतले?” असा जाब विचारत आरोपींनी नितीन यांना शिवीगाळ व दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. या वेळी एका आरोपीने नितीन यांच्या डोक्यात लोखंडी गज मारून त्यांना गंभीर जखमी केले, तसेच “तुला येथे राहू देणार नाही,” अशी धमकी दिली.
नाकाचे हाड तुटले.
या प्राणघातक हल्ल्यात नितीन काळे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जामखेड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जखमी नितीन हे अपंग आहेत. मारहाणीमुळे त्यांच्या नाकाचे हाड तुटले असून डॉक्टरांनी शस्त्रक्रिया (ऑपरेशन) करण्याचा सल्ला दिला आहे. उपचारासाठी पैसे नसल्याने आणि पीडित व्यक्ती अपंग असल्याने, हल्ला करणाऱ्या आरोपींवर लवकरात लवकर व कठोर कारवाई करावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल टी. बी. सोनवणे करत आहेत.
