धुळे/कळंब:29 सप्टेंबर 2026
चाळीसगाव ते धुळे महामार्गावरील मुरमा टेकड्यांजवळ नरव्हाळ (ता. जि. धुळे) वनक्षेत्रात एका गर्भवती महिलेची निर्घृण हत्या करून तिचे प्रेत जाळल्याची धक्कादायक घटना २२ सप्टेंबर २०२६ रोजी उघडकीस आली होती. तपासादरम्यान मयत महिला ही जामखेड कला केंद्रातील नर्तकी पिंकी हनुमंत काटकर (वय ३१) असल्याचे निष्पन्न झाले होते. याप्रकरणी मोहाडीनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेनुसार (BNS) हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणी मुख्य ४ आरोपींना यापूर्वीच धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन मोहाडीनगर पोलिसांच्या स्वाधीन केले होते. मात्र, गुन्ह्यात सहभाग असलेले इतर दोन आरोपी — फारुख हजु शेख आणि रोहिणी स्वप्निल जाधव उर्फ माधुरी महेंद्र मेघे — हे गुन्ह्यात वापरलेल्या होंडा मोबिलिओ कारसह फरार झाले होते.
२७ सप्टेंबर २०२६ रोजी पोलीस निरीक्षक शकील शेख यांना बातमीदाराकडून पक्की माहिती मिळाली की, फरार आरोपी कळंब येथून केज रोडने जेवणासाठी जाणार आहेत. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने केज रोडवरील ‘७/१२ हॉटेल’समोर सापळा रचला. संशयित महिला व पुरुष मिळून आल्यानंतर त्यांची चौकशी केली असता त्यांनी आपली नावे:-
१. फारुख हजु शेख (वय २९, रा. सुर्डी, ता. केज, जि. बीड, ह. मु. शेरे गल्ली, कळंब)
२. रोहिणी स्वप्निल जाधव उर्फ माधुरी महेंद्र मेघे (वय २६, रा. जामखेड कला केंद्र, मूळ रा. छ. संभाजीनगर)
अशी सांगितली.
त्यांचे फोटो मोहाडीनगर पोलिसांना पाठवून खात्री केल्यानंतर दोन्ही आरोपींना कायदेशीर ताब्यात घेण्यात आले. तसेच गुन्ह्यात वापरलेली, नंबर प्लेट काढलेली पांढऱ्या रंगाची होंडा मोबिलिओ कार (MH 43 AR 4070) ही कळंब शहरात बेवारस स्थितीत मिळून आल्याने तीदेखील जप्त करण्यात आली आहे.
आरोपींना वैद्यकीय तपासणीनंतर २८ सप्टेंबर रोजी मोहाडीनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शकील शेख, सपोनि समाधान बजबळकर, पोहेकॉ महादेव मुंडे, अजीज शेख आणि मपोअ सपना गिते यांच्या पथकाने केली.
