जामखेड (प्रतिनिधी):६ ऑक्टोबर २०२६
जामखेड तालुक्यातील आनंदवाडी येथे भीषण पाणीटंचाईचे भीषण वास्तव समोर आले असून, विहिरीचे पाणी खोल गेल्यामुळे सकाळी पाणी उपसण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याचा पाय घसरून विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बबन बन्सी गीते (वय – ४८आनंदवाडी, ता. जामखेड) असे या घटनेत मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या जामखेड तालुक्यात पाण्याचे स्रोत आटल्यामुळे विहिरींनी तळ गाठला आहे. आनंदवाडी परिसरातील विहिरींमधील पाणी खोल गेल्याने दैनंदिन वापरासाठी पाणी मिळवणे कठीण झाले आहे. गुरुवारी सकाळी बबन गीते हे विहिरीवर पाणी काढून आणण्यासाठी गेले होते. विहिरीच्या तळाशी गेलेले पाणी उपसत असताना अचानक त्यांचा पाय घसरला आणि ते थेट खोल विहिरीत कोसळले.
या अपघातात गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांना बाहेर काढले, मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. या घटनेमुळे आनंदवाडीसह संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
तालुक्यात चिंतेचे वातावरण:
जामखेड तालुक्यात दिवसेंदिवस तीव्र होत चाललेल्या दुष्काळामुळे पाण्याची बिकट समस्या निर्माण झाली आहे. पाणी मिळवण्यासाठी नागरिकांना आणि शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या घटनेनंतर हा “जामखेड तालुक्यातील दुष्काळाचा पहिला बळी” असल्याची चर्चा संपूर्ण तालुक्यात पसरली असून, प्रशासनाने तातडीने पिण्याच्या पाण्याची आणि टँकरची सोय करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.
