खर्डा (विशेष प्रतिनिधी): ३ऑक्टोबर २०२६
जामखेड तालुक्यातील मोहरी येथील रहिवासी असलेल्या ३० वर्षीय महिलेचा विहिरीत मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रतिभा अर्जुन कांबळे (वय ३०) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या गेल्या ३० सप्टेंबरपासून घरातून निघून गेल्या होत्या. २ ऑक्टोबर रोजी सकाळी त्यांचा मृतदेह विहिरीत आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मृत प्रतिभा कांबळे या ३० सप्टेंबर २०२६ रोजी घरातून निघून गेल्या होत्या. नातेवाईकांकडून त्यांचा शोध सुरू असतानाच गुरुवारी, २ ऑक्टोबर रोजी सकाळी ७:३० वाजताच्या सुमारास मोहरी शिवारातील संभाजी महादेव हाके यांच्या विहिरीत त्यांचा मृतदेह तरंगताना दिसून आला.
घटना उघडकीस येताच नातेवाईकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह विहिरीतून बाहेर काढला आणि उपचारासाठी जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून प्रतिभा यांना दाखलपूर्व मृत घोषित केले.
याप्रकरणी मृत महिलेचे पती अर्जुन छगन कांबळे (वय २४, रा. मोहरी) यांनी खर्डा पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यानुसार खर्डा पोलिसांत आकस्मिक मृत्यूची (अ.मृ.क्र. २१/२०२६) नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वलसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार क्षिरसागर हे घटनेचा पुढील तपास करत आहेत.
कोट
”वयांमध्ये फरक असलेल्या दाम्पत्याच्या या प्रकरणात ३० सप्टेंबरला अचानक घरातून निघून जाणे आणि २ दिवसांनी मृतदेह विहिरीत आढळणे, यामुळे या मृत्यूबाबत गूढ वाढले असून पोलीस तपासात काय सत्य समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.”असून प्रतिभा कांबळेंच्या मृत्यूबाबत परिसरात तर्क-वितर्क मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
