जामखेड (प्रतिनिधी):8 ऑक्टोबर 2026
जामखेड तालुक्यातील जवळा येथे घरात घुसून कुटुंबाला कोयता व चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ५ आरोपींना जेरबंद केले असून, त्यांच्याकडून जामखेड आणि खर्डा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दरोडा, घरफोडी व जबरी चोरीचे तब्बल १० गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींकडून ६ लाख ९२ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
नेमकी घटना काय घडली होती?
दिनांक २ ऑक्टोबर २०२६ रोजी मध्यरात्री २:०० वाजेच्या सुमारास जवळा (ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) येथील रहिवासी मनिषा श्रीमंत गोरे (वय ४५) यांच्या घरी अज्ञातांनी बेकायदेशीर प्रवेश केला. आरोपींनी घरातील सदस्यांना चाकू व कोयत्याचा धाक दाखवून जीवे मारण्याची भीती घातली आणि घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम जबरदस्तीने चोरून नेली.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६७५/२०२६, बीएनएस (भारतीय न्याय संहिता) कलम ३१० (२) प्रमाणे दरोड्याचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास व कारवाई
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी या गुन्ह्याचा समांतर तपास करून आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले.
त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष तपास पथक तयार करण्यात आले. यामध्ये:
पोलीस अधिकारी: पोउपनि अनंत सालगुडे
पोलीस अंमलदार: निळकंठ कारखेले, फुरकान शेख, श्यामसुंदर जाधव, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, मनोज साखरे, बाळासाहेब खेडकर, अमोल आजबे, प्रकाश मांडगे, प्रशांत राठोड, सुनिता पवार आणि अरूण मोरे यांचा समावेश होता.
दिनांक ७ ऑक्टोबर २०२६ रोजी हे पथक गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाच्या (Technical Analysis) आधारे तपास करत असताना खात्रीशीर माहिती मिळाली की, हा दरोडा प्रदिप उर्फ गुडया बिडकुत्या काळे (रा. पिंपळगाव आवळा) याने त्याच्या साथीदारांसह केला आहे.
पथकाने पिंपळगाव आवळा परिसरात तातडीने छापा टाकून पुढील ५ आरोपींना ताब्यात घेतले:
1. प्रदिप उर्फ गुडया बिडकुत्या काळे (वय ३०, रा. पिंपळगाव आवळा, ता. जामखेड)
2. अनिल सुल्या पवार (वय ३४, रा. पिंपळगाव आवळा, ता. जामखेड)
3. सुविकास बिडकुत्या काळे (वय ४५, रा. पिंपळगाव आवळा, ता. जामखेड)
4. रूक्या उर्फ लोकेश बिडकुत्या काळे (वय ३५, रा. पिंपळगाव आवळा, ता. जामखेड)
5. समाधान उर्फ कारभारी दिपक काळे (वय २१, रा. खर्डा वाकी, ता. जामखेड)
गुन्ह्याची कबुली व महिला सूत्राचा खुलासा
ताब्यात घेतलेल्या प्रदिप काळे याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने धक्कादायक खुलासा केला. हा दरोडा सारिका चंदन काळे (रा. चोभेवाडी, ता. जामखेड) हिच्या सांगण्यावरून व तिने आखलेल्या नियोजनानुसार केल्याचे निष्पन्न झाले.
या गुन्ह्यात खालील ४ आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत:
1. सारिका चंदन काळे (मुख्य नियोजक, रा. चोभेवाडी, ता. जामखेड)
2. लवचिक्या उर्फ लहु जालींदर पवार (रा. घोडेगाव, ता. जामखेड)
3. सोन्या नंग्या काळे (रा. धनेगाव, ता. जामखेड)
4. परबत उर्फ प्रभाकर उर्फ दिपक तुकाराम शिंदे (रा. अचानक तांडा, शिवडी, ता. मंठा, जि. जालना; हल्ली रा. कोरफळे, ता. बार्शी, जि. सोलापूर)
चोरी केलेले सोन्याचे दागिने सारिका काळे व तिचा पती परबत शिंदे यांच्याकडे विक्रीसाठी दिले होते.
जामखेड व खर्डा पोलीस ठाण्यातील १० गुन्हे उघडकीस
आरोपी समाधान उर्फ कारभारी काळे याच्याकडे अधिक चौकशी केली असता, या टोळीने जामखेड तालुक्यातील राजुरी, डोळेवाडी, आरणगाव, धामनगाव, वंजारवाडी, बुऱ्हाणपूर आणि चौंडी या ठिकाणी रात्रीच्या वेळी घरफोडी व चोऱ्या केल्याचे समोर आले.
तपासादरम्यान उघडकीस आलेले गुन्हे:
जामखेड पोलीस ठाणे: गु.र.नं. २७९/२०२६, २८५/२०२६, ३२४/२०२६, ३२३/२०२६, ५१७/२०२६, ३९५/२०२६, ६४३/२०२६, २७९/२०२६
खर्डा पोलीस ठाणे: गु.र.नं. १६१/२०२६
६,९२,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
आरोपींनी चोरीचे सोन्याचे दागिने त्यांचे ओळखीचे भाऊ बिभीषण सावंत व हनुमंत आबासाहेब वायकर (दोघे रा. खर्डा हद्द वाकी, ता. जामखेड) यांच्याकडे ठेवण्यासाठी दिले होते.
जप्त केलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा तपशील:
सोन्याची अंगठी (०.५ ग्रॅम) – ₹ ७,०००/-
सोन्याचे मंगळसूत्र (५ ग्रॅम) – ₹ ७५,०००/-
सोन्याची बोरमाळ (१० ग्रॅम) – ₹ १,५०,०००/-
सोन्याची बोरमाळ – ३० मणी (१० ग्रॅम) – ₹ १,५०,०००/-
सोन्याचे मणीमंगळसूत्र (७ ग्रॅम) – ₹ १०,५००/-
सोन्याचे गंठण (१० ग्रॅम) – ₹ १,५०,०००/-
सोन्याचे गंठण (५ ग्रॅम) – ₹ ७५,०००/-
सोन्याची कर्णफुले (५ ग्रॅम) – ₹ ७५,०००/-
एकूण जप्त सोन्याचे वजन: ५२.५ ग्रॅम
एकूण मुद्देमाल किंमत: ₹ ६,९२,५००/-
ताब्यातील आरोपी रूक्या उर्फ लोकेश बिडकुत्या काळे यास जामखेड पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यात हजर केले असून, तो २०१५ मधील जबरी चोरीच्या एका गुन्ह्यातही (भादंवि ३९४) पाहिजे असलेला आरोपी आहे. इतर आरोपींना मुद्देमालासह मुख्य दरोड्याच्या गुन्ह्यात जामखेड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
ही कामगिरी अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
कोट
जामखेड तालुक्यातील जवळा येथील दरोड्याच्या घटनेनंतर विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी पीडित कुटुंबाची प्रत्यक्ष भेट घेऊन सांत्वन केले होते. तसेच, पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधून दरोडेखोरांना लवकरात लवकर जेरबंद करण्याचे कठोर निर्देश दिले होते, ज्यानंतर पोलिसांनी ही यशस्वी कारवाई केली आहे.
