अहिल्यानगर:५ ऑक्टोबर २०२६
नाशिक येथून शिर्डीकडे जाण्यासाठी उबेर (Uber) गाडी बुक करून, चालकाला कोयत्याचा धाक दाखवत तिघांनी कार व मोबाईल जबरीने पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली होती. याप्रकरणी अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक कारवाई करत बदलापूर (जि. ठाणे) येथून तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींकडून कारसह ११ लाख ७१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
काय आहे नेमकी घटना?
दिनांक १ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे २.३० वाजेच्या सुमारास सोपान गोविंद दंडगुले (वय ३६, रा. दिघी, पुणे) हे आपल्या अर्टिगा कारने उबेरवरून मिळालेले भाडे घेऊन नाशिक येथून शिर्डीकडे चालले होते. दरम्यान, गाडीत बसलेल्या तीन प्रवाशांनी कोपरगाव परिसरामध्ये चालकाला गाडी पोहेगावच्या दिशेने घेण्यास सांगितली. त्यानंतर आरोपींनी चालकाला कोयत्याचा धाक दाखवून त्यांचे तोंड, डोळे, हात व पाय दोरीने बांधले. चालकाला वांबोरी (ता. राहुरी) येथे गाडीतून खाली ढकलून देत आरोपी अर्टिगा कार व मोबाईल घेऊन पसार झाले. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा (गु.र.नं. ११३३/२०२६ BNS कलम ३०९(६), १४०(३), ३(५)) दाखल करण्यात आला होता.
ल
अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि संदीप दरवडे व विशेष पथकाने गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे समांतर तपास सुरू केला. तपासादरम्यान हे कृत्य बदलापूर येथे वास्तव्यास असलेल्या तीन तरुणांनी केल्याची पक्की माहिती मिळताच पथकाने बदलापूर गाठून तिघांना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेले आरोपी:
१. शामसुंदर रविप्रताप गौड (वय २६, रा. बदलापूर, जि. ठाणे, मूळ रा. महाराजगंज, उत्तर प्रदेश)
२. सिध्दार्थ मिथवा चव्हाण (वय १९, रा. बदलापूर, जि. ठाणे, मूळ रा. आष्टी, जि. बीड)
३. किसन दिग्वीजय कहार (वय २२, रा. बदलापूर, जि. ठाणे, मूळ रा. महाराजगंज, उत्तर प्रदेश)
११.७१ लाखांचा मुद्देमाल जप्त
आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी चोरी केलेली अर्टिगा कार जेऊर टोलनाक्याजवळील हनुमान मंदिर परिसरात लॉक करून ठेवल्याची आणि ती विकण्यासाठी गिऱ्हाईक शोधत असल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून:
१०,००,००० रुपये किंमतीची मारुती सुझुकी अर्टिगा कार
१,७१,००० रुपये किंमतीचे ३ मोबाईल, सीमकार्ड व कारची चावी
२०० रुपये किंमतीच्या २ लोखंडी कत्ती (कोयते)
असा एकूण ११,७१,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आरोपींना मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी राहुरी पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि संतोष मुटकुळे, पोउपनि संदीप दरवडे, पोलीस अंमलदार सोमनाथ झांबरे, विशाल तनपुरे, भगवान सानप, सतीश भवर, फुरकान शेख, प्रशांत राठोड व भगवान धुळे यांच्या पथकाने केली.
