अहिल्यानगर:३१ ऑगस्ट २०२६
जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक मोहीम हाती घेतली असून, अवैध गुटखा आणि सुगंधित तंबाखू विक्री करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. मिरजगाव, नेवासा, राहाता आणि राहुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण ८ ठिकाणी छापे टाकून पोलिसांनी ३,१८,२८४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी १३ आरोपींविरोधात ८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील बेकायदेशीर धंद्यांवर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली चार विशेष पथके तयार करण्यात आली. या पथकांनी ३० ऑगस्ट रोजी गुप्त माहितीच्या आधारे विविध ठिकाणी अचानक छापे टाकले.
कारवाईचा सविस्तर तपशील:
मिरजगाव परिसर:
धनंजय वसंत सातव (वय ४५, रा. पिरसाहेब गल्ली, मिरजगाव) याच्याकडून ८,२४० रुपयांचा माल जप्त.
दादा नारायण गदादे (रा. गुरवपिंप्री रोड, मिरजगाव) याच्यावर कारवाई करत १४,००० रुपयांचा माल जप्त (आरोपी फरार).
सागर हनुमंत गोरे (वय २९, रा. गोरे मळा, कर्जत) याच्याकडून ५८,६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त.
नेवासा परिसर:
कुकाणा येथील बाजारात कारवाई करत बाळासाहेब रावासाहेब जावळे (वय ३५) व बाबू उर्फ बबलु पठाण (रा. शेवगाव) यांच्याकडून १४,००० रुपयांचा माल जप्त.
अबरार रशीद शेख (वय ४०, रा. देवगाव रोड, कुकाणा) आणि आसिफ तांबोळी (रा. शेवगाव – फरार) यांच्याकडून १८,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त.
राहाता परिसर:
शनिमंदिर रोड परिसरातील इम्रान शफी तांबोळी (वय ३५), जमीर शफी तांबोळी (वय ३८) आणि पापाभाई नजीर शेख (वय ५३) यांच्याकडून ३१,३५० रुपयांचा गुटखा जप्त.
राहुरी परिसर:
बाबासाहेब भाऊराव गागरे (वय ४३, रा. म्हैसगाव) व पवन गिरासे याच्याकडून २६,४९२ रुपयांचा माल जप्त.
दुसऱ्या कारवाईत पवन उर्फ पृथ्वीराज दगडूसिंग गिरासे (वय ३१, रा. राहुरी) याच्याकडून १,४७,५५२ रुपयांचा सर्वात मोठा साठा जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोउपनि संदीप दरवडे, कृष्णकुमार सेदवाड, आणि पोलीस अंमलदार अरुण गांगुर्डे, रोहित मिसाळ, मनोज साखरे, ज्योती शिंदे यांच्यासह एलसीबीच्या पथकाने पार पाडली. जिल्ह्यात अवैध गुटखा व सुगंधित तंबाखूची खरेदी-विक्री करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
