अहिल्यानगर:५ सप्टेंबर २०२६
शहरातील वाढत्या अवैध धंद्यांवर वेश्या व्यवसायाविरोधात अहिल्यानगर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रेल्वे स्टेशन परिसरातील संजीवनी कॉलनीत धाड टाकून कुंटणखान्याचा पर्दाफाश केला. या कारवाईत २ पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, हा व्यवसाय चालवणाऱ्या एका ४४ वर्षीय महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक कल्पना पवार व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि संदीप दरवडे व त्यांच्या पथकाने ही मोहीम राबवली.
३ सप्टेंबर रोजी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, रेल्वे स्टेशन जवळील संजीवनी कॉलनीतील पानसरेवाडा येथे राहणारी झिनत फैय्याजअली महंमद (वय ४४) ही स्वतःच्या घरात कुंटणखाना चालवत आहे. माहितीची खात्री करण्यासाठी पोलिसांनी पंचांसमक्ष एका
अंमलदाराला बनावट ग्राहक (डिकॉय) म्हणून पाठवले.
वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खात्री पटताच पथकाने तात्काळ तेथे छापा टाकला. घराची झडती घेतली असता आरोपी महिला झिनत महंमद हिच्यासह २ पीडित महिला आढळून आल्या. आरोपी महिला स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी व उपजीविकेसाठी या महिलांकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे तपासात उघड झाले.
याप्रकरणी आरोपी झिनत फैय्याजअली महंमद हिच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात ‘स्त्रिया व मुलींचे अनैतिक व्यापारास (प्रतिबंध) कायदा १९५६’ च्या कलम ३, ४, ५, ७ व ८ अन्वये गुन्हा (गु.र.नं. ८४५/२०२६) दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कोतवाली पोलीस करत आहेत
