अहिल्यानगर:२५सप्टेंबर २०२६
घराच्या खोदकामात सापडलेले सोने स्वस्तात विकण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका आंतरजिल्हा टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून १६०० ग्रॅम बनावट सोन्याचे दागिने आणि ११ मोबाईल जप्त केले आहेत.
नक्की काय घडली घटना?
नवनागापूर (एमआयडीसी, अहिल्यानगर) येथील रहिवासी सचिन बाळासाहेब वाघ (वय ३०) यांना दोन-तीन दिवसांपूर्वी तीन अनोळखी व्यक्तींनी संपर्क साधला. घराच्या खोदकामात १ किलो सोने सापडले असून ते स्वस्तात विकायचे असल्याचे सांगून त्यांनी वाघ यांचा विश्वास संपादन केला. वाघ यांनी आरोपींना १ लाख रुपये ॲडव्हान्स दिले. उर्वरित व्यवहारासाठी आरोपींनी त्यांना २३ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ११ वाजता जुन्या आरटीओ ऑफिस परिसरात बोलावले होते.
मात्र, वाघ यांना संशय आल्याने त्यांनी तत्काळ स्थानिक गुन्हे शाखेशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला.
पोलिसांनी रचला सापळा
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार विजय ठोंबरे, संदीप पवार, शाहिद शेख, विशाल गवांदे, संतोष खैरे, रोहित मिसाळ, प्रशांत राठोड व भाग्यश्री भिटे यांच्या पथकाने जुन्या आरटीओ ऑफिस परिसरात पंचासमक्ष सापळा रचला. संशयास्पदरीत्या वावरणाऱ्या दोन पुरुष आणि एका महिलेला ताब्यात घेण्यात आले.
अटक करण्यात आलेले आरोपी:
१. राहुल शंभू सोलंकी (वय २४, रा. रामटेक, जि. नागपूर)
२. नंदू मानसिंग सोलंकी (वय ३६, रा. पडसोडा, रामटेक, जि. नागपूर)
३. पूजा राहुल सोलंकी (वय २४, रा. रामटेक, जि. नागपूर)
५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
आरोपींची झडती घेतली असता त्यांच्याकडून १६०० ग्रॅम वजनाची बनावट सोन्याच्या मण्यांची माळ, ५२ हजार रुपये किमतीचे ११ मोबाईल आणि एक हँडबॅग जप्त करण्यात आली. आरोपी राहुल सोलंकी याने दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या मोबाईलचा वापर करून ते स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक करत असत.
तिन्ही आरोपींना जप्त मुद्देमालासह तोफखाना पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून त्यांच्याविरोधात गुन्हा नोंद (गु.र.नं. ८१७/२०२६) करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.
