जामखेड / २४ सप्टेंबर २०२६
अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील मूळ रहिवासी असलेल्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने जमिनीच्या खरेदीवरून झालेल्या वादातून आपल्या तीन महिन्यांच्या गरोदर पत्नीची धारदार हत्याराने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हत्येनंतर आरोपी पतीने स्वतःवर ब्लेडने वार करत इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला.
जामखेडमधील जमिनीची खरेदी ठरली वादाचे कारण:
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पती आकाश रामदास बारसकर (वय ३१, मूळ रा. वाघा, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) हा पुण्यातील हिंजवडी येथील एका आयटी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे. आकाशने काही महिन्यांपूर्वी आपल्या मूळ गावी म्हणजेच जामखेड तालुक्यातील वाघा येथे शेतीची जमीन खरेदी केली होती. मात्र, पती आकाशने जामखेडला जमीन घेण्याऐवजी पुण्यातच घर किंवा मालमत्ता खरेदी करावी, अशी त्याची पत्नी शुभांगी (वय २८) हिची इच्छा होती. या जामखेडमधील शेतजमिनीच्या खरेदीवरूनच गेल्या काही महिन्यांपासून पती-पत्नीमध्ये सतत वाद होत होते.
२० सप्टेंबर रोजी पहाटे देहूगाव येथील भाड्याच्या खोलीत पुन्हा याच मुद्द्यावरून कडाक्याचे भांडण झाले. रागाच्या भरात आकाशने धारदार हत्याराने शुभांगी यांच्या गळ्यावर वार केले, ज्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. पत्नीचा मृत्यू झाल्याचे पाहून आकाशने स्वतःवर ब्लेडने वार केले आणि दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली.
सध्या आरोपीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून, देहूरोड पोलिसांनी मृत शुभांगी यांच्या वडिलांच्या तक्रारीवरून आकाश बारसकरविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) १०३(१) नुसार खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
जामखेड तालुक्यातील वाघा गावचा रहिवासी असलेल्या उच्चशिक्षित तरुणानेच रागाच्या भरात गरोदर पत्नीचा असा दुर्दैवी अंत केल्याची बातमी पसरताच, जामखेड तालुका आणि पुण्याच्या आयटी क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.
