अहिल्यानगर:१२ सप्टेंबर २०२६
जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिले आहेत. या आदेशानुसार कारवाई करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत सापळा रचून एका तरुणास गावठी कट्ट्यासह (पिस्तुल) जेरबंद केले आहे.
सुमित सॅमसन ठोसरे (वय २७, रा. गणेश चौक, बोल्हेगाव फाटा, एमआयडीसी, जि. अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याचा साथीदार जितेंद्रसिंह सुरेंद्रसिंह राठोड (रा. पितळे कॉलनी, बोल्हेगाव) हा सध्या फरार झाला आहे.
हॉटेल किनारासमोर रचला सापळा
दिनांक ११ सप्टेंबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक एमआयडीसी परिसरामध्ये अवैध धंद्यांची माहिती घेत गस्त घालत होते. यादरम्यान, दूध डेअरी चौक ते शेंडी रस्त्यावरील ‘हॉटेल किनारा’ समोर एक तरुण अवैध गावठी कट्टा घेऊन थांबला असल्याची गुप्त माहिती पथकाला मिळाली.
माहिती मिळताच पथकाने पंचांसमक्ष नमूद ठिकाणी धाड टाकून संशयित तरुण सुमित ठोसरे यास ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून ४०,००० रुपये किमतीचा एक गावठी कट्टा जप्त करण्यात आला.
पोलीस चौकशीदरम्यान संशयिताने हा गावठी कट्टा त्याचा साथीदार जितेंद्रसिंह राठोड याच्याकडून घेतल्याची कबुली दिली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गु.र.नं. ७२९/२०२६, आर्म अॅक्ट कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार आरोपीचा शोध व गुन्ह्याचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखालील पथकातील पोलीस अंमलदार विजय ठोंबरे, विष्णू भागवत, संदीप पवार, बाळासाहेब नागरगोजे, अशोक लिपणे आणि सतीश भवर यांच्या पथकाने केली आहे.
