जामखेड प्रतिनिधी -२ ५ऑगस्ट २०२६
आमदार रोहित पवार यांच्यासह २०२३ मध्ये काढलेला कौटुंबिक फोटो फेसबुकवर प्रकाशित करून त्याखालीच्या टिप्पण्या आणि प्रतिक्रिया द्वारे एका महिलेस बदनामी केल्याची तक्रार थेरगाव परिसरातून करण्यात आली आहे. वाकड पोलिसांनी कर्जत – जामखेड मधील आरोपींविरुद्ध फक्त अदखलपात्र गुन्हा नोंदवून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप महिलेने तक्रारीत करण्यात आला आहे. महिलेने पत्रकाद्वारे आरोपींना तत्काळ अटकेची मागणी केली आहे.
थेरगाव येथील तक्रारनिवेदक महिलेने वाकड पोलीस ठाण्यात माऊली हळणवर (रा. ईश्वर वठार, पंढरपूर, जि. सोलापूर), सचिन सखाराम पोटरे (रा. कर्जत, अहिल्यानेगर) आणि तुषार बोथरा (रा. जामखेड, जि. अहिल्यानेगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
तक्रारीत म्हटले आहे की, महिला आणि तिचे कुटुंब थेरगाव परिसरात वास्तव्यास असून, तिचे पती सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. आमदार रोहित पवार त्यांच्या कामासाठी थेरगावमध्ये आले असताना त्यांच्या घरी कौटुंबिक फोटो काढण्यात आला होता. २०२३ मधील हा फोटो माऊली हळणवर आणि सचिन पोटरे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर शेअर केला, असे तक्रारीत म्हटले आहे. २७ जुलै २०२६ रोजी या पोस्टमुळे संबंधित महिलेच्या लक्षात आले की, फोटोखाली करण्यात आलेल्या मजेशीर किंवा व्यंगात्मक टिप्पणींमुळे तिची आणि तिच्या कुटुंबाची समाजातील प्रतिष्ठा नुकसान झाली आहे.
महिलेकडून करण्यात आलेल्या तक्रारीत पोलिसांनी गुन्हा नोंदवून योग्य कारवाई करावी व आरोपींना ताब्यात घेऊन तपास करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येत असलेल्या वाकड पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक स्वाती घुगे या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई करत असून, भारतीय नागरिक सुरक्षा संहितेनुसार संबंधितांना नोटीस जारी करण्यात आली आहे.
