अहिल्यानगर (विशेष प्रतिनिधी):५ सप्टेंबर
जिल्ह्यात सर्रास सुरू असलेल्या अवैध गुटखा, मावा आणि सुगंधित तंबाखूच्या विक्रीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मोठी कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार एलसीबीच्या ५ पथकांनी अकोले, राजूर, कर्जत, श्रीरामपूर आणि श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच वेळी १० ठिकाणी धाडी टाकून २० आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत एकूण २,७६,८९६ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
५ पथकांचे ५ तालुक्यांत छापे
अहिल्यानगर जिल्ह्याला गुटखामुक्त करण्यासाठी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने एलसीबीचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे आणि २५ हून अधिक कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली ५ विशेष पथके तयार करण्यात आली.
या पथकांनी ४ आणि ५ सप्टेंबर रोजी अकोले, राजूर, कर्जत, श्रीरामपूर शहर आणि श्रीगोंदा परिसरात शोधमोहीम राबवून अवैध गुटखा आणि सुगंधित तंबाखूची विक्री व निर्मिती करणाऱ्यांवर छापे टाकले.
१० ठिकाणी छापे: अकोले (१), राजूर (२), कर्जत (३), श्रीरामपूर (२) आणि श्रीगोंदा (२).
२० जणांवर गुन्हे दाखल: एकूण २० आरोपींवर भारतीय न्याय संहिता (BNS) च्या विविध कलमांन्वये १० वेगवेगळे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
फरार आरोपींचा शोध सुरू: कारवाईदरम्यान ९ आरोपींना जागीच ताब्यात घेण्यात आले असून, नाशिक, बीड, अहिल्यानगर आणि इतर भागातील ११ फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
जप्त मुद्देमाल: विविध ब्रँडचा अवैध गुटखा, सुगंधित तंबाखू आणि मावा असा एकूण ₹२,७६,८९६ चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. (यामध्ये सर्वाधिक ₹८५,३०० चा साठा श्रीरामपूर शहरातून तर ₹७३,२८० चा साठा श्रीगोंदा येथून हस्तगत करण्यात आला).
बेकायदेशीर धंद्यांवर कारवाई सुरूच राहणार
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि एलसीबी प्रमुख संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली ही यशस्वी कामगिरी पार पडली. जिल्ह्यात कुठेही अवैध गुटखा किंवा मावाची विक्री होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी थेट पोलिसांशी संपर्क साधावा, तसेच बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
