खर्डा (प्रतिनिधी):८ सप्टेंबर २०२६
जामखेड-खर्डा हायवेवर डोळ्यात मिरची पूड टाकून १० लाख ५० हजार रुपये आणि मोबाईल लुटल्याची खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या इसमाचा बनाव खर्डा पोलिसांनी अत्यंत तत्परतेने उघडकीस आणला आहे. या प्रकरणी तक्रारदारावरच खर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
दिनांक ०८/०९/२०२६ रोजी दुपारी १२:०७ वाजेच्या सुमारास खर्डा पोलीस स्टेशनला ‘डायल ११२’ वर एक कॉल प्राप्त झाला. सतेवाडी फाट्याजवळ बालाजी अर्जुन लांडगे (वय ३९, रा. सुर्वेगल्ली, खर्डा) यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून १० लाख ५० हजार रुपये आणि मोबाईल लुटल्याचा दावा कॉलरने केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव, पोलीस उपनिरीक्षक अशोक खेडकर व सहकाऱ्यांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
सीटीटीव्ही अन् सखोल चौकशीतून बनाव उघड
पुण्याहून खर्डा येथे येत असताना विना नंबरच्या दोन स्प्लेंडर मोटरसायकलवरून आलेल्या इसमांनी गाडी अडवून लुटल्याचा दावा तक्रारदाराने केला होता. मात्र, पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता कोणतीही संशयास्पद बाब आढळून आली नाही. तसेच जामखेड रोडवरील सर्व सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासले असता तक्रारदाराने सांगितलेल्या वर्णनाची कोणतीही गाडी तिथून गेल्याचे दिसले नाही.
त्यानंतर पोलिसांनी बालाजी लांडगे यांची अधिक सखोल व कसून चौकशी केली असता, त्यांनी रचलेला बनाव उघडा पडला. खर्डा शहरातील लोकांचे घेतलेले देणे परत करावे लागू नये, यासाठी हा सर्व बनाव रचल्याची कबुली तक्रारदाराने दिली.
पोलीस यंत्रणेची दिशाभूल करून खोटी माहिती दिल्याप्रकरणी बालाजी अर्जुन लांडगे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २१२ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. सुदर्शन मुमक्का, अपर पोलीस अधीक्षक श्री. वैभव कलुबर्गे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गणेश जाधव, पोउनि अशोक खेडकर, संभाजी शेंडे, शशी म्हस्के, बाळू खाडे, राहुल खेडकर आणि प्रवीण थोरात यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोहेकॉ संभाजी शेंडे करत आहेत.
पोलीस प्रशासन आवाहन:
“डायल ११२ ही सुविधा नागरिकांच्या तातडीच्या सुरक्षेसाठी व आपत्कालीन मदतीसाठी आहे. या क्रमांकावर कॉल करून खोटी माहिती दिल्यास किंवा विनाकारण त्रास दिल्यास संबंधित इसमावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.”
— उज्वलसिंह राजपूत, सहाय्यक पोलीस निरीक्षक, खर्डा पोलीस स्टेशन
