खर्डा : ८ सप्टेंबर २०२६
येथील ईट रोडवरील श्री मोरप्पा (मयुरेश्वर) महादेव मंदिरात आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार, खर्डा यांच्या वतीने श्रावण मासानिमित्त आयोजित सामूहिक रुद्रपूजा उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडली. रुद्रपूजेच्या वेळीच परिसरात रिमझिम पावसाने हजेरी लावल्याने शिवभक्तांचा उत्साह द्विगुणित झाला.
सोमवार, दि. ७ सप्टेंबर रोजी दुपारी ६.३० वाजता झालेल्या या रुद्रपूजेचे मार्गदर्शन आर्ट ऑफ लिव्हिंग, बेंगळुरू आश्रम येथील स्वामी शिवतेजजी भैय्या यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी सामूहिक मंत्रोच्चार, अभिषेक व विविध धार्मिक विधी भक्तिभावाने पार पडले.
श्रावण महिन्यात भगवान शिवाची आराधना करण्याला विशेष महत्त्व आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित सामूहिक रुद्रपूजेमुळे परिसरातील शिवभक्तांना सामूहिक प्रार्थना व आध्यात्मिक साधनेचा अनुभव घेता आला. मंदिर परिसरात दिवसभर भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
विशेष म्हणजे रुद्रपूजा सुरू असतानाच वरुणराजाने रिमझिम पावसाच्या रूपाने हजेरी लावली. महादेवाच्या पूजेवेळी पाऊस झाल्याने हा शिवकृपेचा प्रसाद असल्याची भावना उपस्थित भाविकांनी व्यक्त केली. पावसामुळे वातावरण अधिक प्रसन्न झाले असून, भक्तांनी भगवान शंकराप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारातील प्रशिक्षक संतोष थोरात, अमोल चिंतामणी, साधक रवींद्र कुलकर्णी, नानासाहेब गोपाळघरे, प्रकाश सोनटक्के, गणेश जोगदंड, कल्याण सुरवसे, महालिंग कोरे, महेश दिंडोरे, श्रीकांत लोखंडे, सावता लोखंडे, बबन नाईक, हनुमंत कोरे, गणेश सुळ, अनिल राऊत, सोनू परमार, श्रीकांत भैसडे, महेश बडोदकर,आदेश परमार,वैशाली थोरात, मनीषा कुलकर्णी, जया जोगदंड, भाग्यश्री राळेभात, पिंगल लोखंडे, रंजना लोखंडे, कमल निकम , सुनंदा भैसडे यांच्यासह अनेक शिवभक्तांनी परिश्रम घेतले.
रुद्रपूजेनंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या या उपक्रमामुळे खर्डा परिसरातील शिवभक्तांमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
