खर्डा(विशेष प्रतिनिधी): १३ सप्टेंबर
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲप (WhatsApp) स्टेटसवर मराठा आंदोलक श्री. मनोज जरांगे पाटील यांच्या फोटोसंदर्भात आक्षेपार्ह मजकूर आणि इमोजी टाकून जातीय द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका तरुणावर खर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
नायगाव (ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) येथील रहिवासी विकास युवराज शिंदे (वय २५) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ११ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास त्यांनी व्हॉट्सॲप स्टेटस पाहताना विठ्ठल तोंडे (रा. सतेवाडी, ता. जामखेड) याच्या स्टेटसवर मनोज जरांगे पाटील यांचा फोटो आणि त्यावर ‘अध्यक्ष महोदय हे चुकीचं आहे’ अशा मजकुरासह हसणारे दोन इमोजी पाहिले.
या प्रकारानंतर फिर्यादीने तोंडे याला मेसेज करून विचारणा केली असता, दोघांमध्ये व्हॉट्सॲपवर शाब्दिक वाद झाला. त्यानंतर विकास शिंदे यांनी विठ्ठल तोंडे यास फोन करून मनोज जरांगे पाटील यांचा फोटो अशा प्रकारे स्टेटसवर ठेवण्याबाबत जाब विचारला. त्यावर आरोपीने ‘माझी मर्जी, मी काहीही करेन’ असे उत्तर देत फोन कट केला आणि त्यानंतर ते स्टेटस डिलीट केले.
रविराज साबळे यांनी व्यक्त केला निषेध, नायगाव ग्रामस्थांनी मानले आभार;
व्हॉट्सॲप स्टेटसच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांचा अवमान करून समाजात जातीय द्वेष व दोन जातींमध्ये शत्रूत्वाची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
या घटनेची माहिती मिळताच गोरगरीब जनतेचे सामाजिक कार्यकर्ते रविराज साबळे यांनी तात्काळ खर्डा पोलीस स्टेशनला रात्री १ वाजेपर्यंत बसून घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आणि संबंधित समाजकंटकावर कडक कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत गुन्हा दाखल करून घेतला आहे .
त्यांच्या या भूमिकेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, समस्त नायगाव ग्रामस्थांच्या वतीने रविराज साबळे यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.यावेळी स्मस्त नायगावकर मोठ्या संखेने उपस्थित होते.
भारतीय न्याय संहितेनुसार (BNS) गुन्हा दाखल याप्रकरणी विकास शिंदे यांच्या फिर्यादीवरून खर्डा पोलिसांनी (FIR No. 0159/2026) आरोपी विठ्ठल बापू तोंडे (रा. सतेवाडी, ता. जामखेड) याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३५३(२) आणि कलम ३५६ अन्वये कायदेशीर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास खर्डा पोलीस करीत आहेत.
