जामखेड:४ ऑक्टोबर २०२६
तालुक्यातील खर्डा हद्दीतील मोहरी येथील सोलर प्लॅनेटवर प्रकल्प सुरू झाल्यापासून सलग ३ वर्षे अविरत आणि प्रामाणिक सेवा देणाऱ्या ३३ सुरक्षारक्षकांवर नव्याने आलेल्या एजन्सीकडून तीव्र अन्याय होत असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पगारवाढ मिळताच कंत्राट बदलून सुरक्षारक्षकांना धमकावल्यामुळे कामगारांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
मागील ३ वर्षांपासून कार्यरत असलेल्या ‘वैष्णवी सिक्युरिटी सर्व्हिस’च्या मालकांनी सातत्याने पाठपुरावा करून चालू महिन्यातच सुरक्षारक्षकांसाठी पगारवाढ मंजूर करून आणली होती. मात्र, पगारवाढ मंजुरीनंतर कंपनीने अचानक सदर एजन्सीला काढून ‘अण्णा एंटरप्रायझेस सिक्युरिटी’ या नव्या एजन्सीला कंत्राट दिले.
नवीन कंत्राटदार ‘अण्णा एंटरप्रायझेस’च्या प्रमुखाकडे सुरक्षारक्षकांनी हक्काच्या पगारवाढीची मागणी केली असता, त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यात आली. तसेच धमक्या देऊन मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप कामगारांनी केला आहे.
ही नवीन एजन्सी वेळेवर पीएफ (PF) आणि ईएसआयसी (ESIC) ची रक्कम जमा करत नाही, तसेच कर्मचाऱ्यांचे तब्बल ६-६ महिने पगार तुंबवून ठेवते, अशी माहिती समोर आली आहे.
सर्व ३३ सुरक्षारक्षकांच्या पाठीशी ‘अहिल्यानगर जिल्हा मजदूर सेना’ खंबीरपणे उभी राहिली असून कायदेशीर मार्गाने लढा देत आहे. मात्र, एजन्सीचे प्रमुख गुंडगिरीच्या बळावर ही युनियन मोडून काढण्याचा प्रयत्न करत आहेत.
सुरक्षारक्षकांची ठाम भूमिका:
“आम्हाला गुंड प्रवृत्तीची ‘अण्णा एंटरप्रायझेस’ ही एजन्सी नको असून, वाढीव पगारासह पूर्वीचीच ‘वैष्णवी सिक्युरिटी सर्व्हिस’ पूर्ववत ठेवावी,” अशी ठाम भूमिका सर्व ३३ सुरक्षारक्षकांनी घेतली आहे.
गेल्या ३ वर्षांपासून प्रामाणिक सेवा करणाऱ्या या कामगारांवरील अन्याय त्वरित थांबवावा, गुंडगिरी करणाऱ्या नवीन एजन्सीवर कडक कारवाई करावी आणि वैष्णवी सिक्युरिटी सर्व्हिसला पूर्ववत काम द्यावे, अशी जोरदार मागणी त्यांनी पोलीस वारंट न्यूज नेटवर्कवर बोलताना केली आहे .
सदर प्रकरणाची न्यायाची मागणी फोन वरून संपर्क साधून सुरक्षकानी विधानपरिषेद सभापती प्रा.राम शिंदे यांच्याकडे केली आहे. व त्यांनी सभापती राम शिंदे यांच्याकडूनच आम्हाला गोरगरिबांना न्याय मिळणार असल्याचे सांगितले
विधानपरिषद सभापतींकडे न्यायाची साद:
या संपूर्ण अन्यायाविरोधात सुरक्षारक्षकांनी फोनवरून संपर्क साधून विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांच्याकडे न्यायाची मागणी केली आहे. “आमच्यासारख्या गोरगरिबांना सभापती राम शिंदे यांच्याकडूनच न्याय मिळेल,” असा विश्वास सुरक्षारक्षकांनी व्यक्त केला आहे.
