अहिल्यानगर:१२ सप्टेंबर२०२६
समृद्धी महामार्गावर वाहनदुरुस्ती करणाऱ्या चालकाला चाकूचा धाक दाखवून मारहाण करत लुटणाऱ्या सराईत दरोडेखोरांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवघ्या चार दिवसांत पर्दाफाश केला आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी ४ आरोपींना ताब्यात घेतले असून २ साथीदार फरार झाले आहेत. आरोपींकडून चोरीचे मोबाईल, रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण १ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
धनंजय उर्फ धनु प्रकाश काळे (वय २७, रा. सवंत्सर, कोपरगाव), स्वप्नील संतोष भारूड (वय २०), प्रशांत जालींदर भारूड (वय २०, दोघे रा. भिमवाडी, कोपरगाव) आणि शिवरंजन राजेश शिंदे (वय २२, रा. सवंत्सर, कोपरगाव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर चंदू नारायण तहकीक (रा. सावळीविहीर, राहाता) व त्याचा एक मित्र सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
नेमकी घटना काय?
दिनांक ८ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री १:१५ वाजेच्या सुमारास साकुरी येथील मेकॅनिक अभिषेक मच्छिंद्र गायकवाड हे समृद्धी महामार्गावरील पोल क्र. ५०८ जवळ आयशर गाडी दुरुस्त करत होते. त्यावेळी अचानक आलेल्या ६ दरोडेखोरांनी त्यांना व त्यांच्या साथीदाराला चाकूचा धाक दाखवून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. आरोपींनी त्यांच्याकडील मोबाईल आणि रोख रक्कम जबरदस्तीने चोरून नेली. या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
१५० सीसीटीव्ही फुटेज अन् ४ दिवस सतत पाठलाग
महामार्गावरील या गंभीर घटनेची दखल घेत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार एलसीबीचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी तपासासाठी चार विशेष पथके तैनात केली.
तपास पथकाने घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. तांत्रिक विश्लेषण आणि समृद्धी महामार्गावरील तब्बल १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज सलग चार दिवस तपासून आरोपींचा सुगावा लावला. यादरम्यान गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की, हा दरोडा धनु काळे व त्याच्या साथीदारांनी केला असून ते कोकमठाण शिवारात महामार्गाच्या पुलाजवळ बसले आहेत. पथकाने लागलीच तेथे छापा टाकून ४ जणांना ताब्यात घेतले.
रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार
पोलीस चौकशीत अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी धनु काळे याच्यावर दरोडा, घरफोडी, जबरी चोरी आणि मारहाण असे ९ गंभीर गुन्हे आधीच दाखल असल्याचे उघडकीस आले आहे. तर त्याचा साथीदार स्वप्नील भारूड याच्यावरही ६ गुन्हे नोंद आहेत.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली खालील अधिकाऱ्यांच्या व अंमलदारांच्या पथकाने केली आहे:
पोलीस अधिकारी: पो.उ.नि. संदीप दरवडे, पो.उ.नि. अनंत सालगुडे, पो.उ.नि. विकास जाधव.
पोलीस अंमलदार: रणजीत जाधव, अरुण गांगुर्डे, निळकंठ कारखेले, विष्णू भागवत, सोमनाथ झांबरे, विजय पवार, राहुल डोके, प्रकाश मांडगे, मनोज साखरे, बाळासाहेब खेडकर, अमृत आढाव, किशोर शिरसाठ, सुनील मालणकर, भगवान थोरात, रिचर्ड गायकवाड, महादेव भांड, गणेश धोत्रे, सुनील पवार, रमीजराजा आतार, अजिनाथ पाखरे, विशाल तनपुरे, फुरकान शेख, प्रशांत राठोड व भगवान धुळे.
गुन्ह्याचा पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस करत आहेत.
