अहिल्यानगर:१२ सप्टेंबर २०२६
आगामी गणेशोत्सव, घटस्थापना आणि दसरा या सण-उत्सवांच्या काळात अहिल्यानगर जिल्हा प्रशासन आणि पोलिसांच्या वतीने मोठा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यात सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी डॉल्बी साऊंड सिस्टीमच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
यासंदर्भातील अधिकृत आदेश अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब गिते यांनी जारी केले आहेत.
१४ सप्टेंबर ते २० ऑक्टोबरदरम्यान लागू राहणार आदेश
पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या अहवालानुसार, १४ सप्टेंबर २०२६ (गणेश स्थापना) ते २५ सप्टेंबर २०२६ (गणेश विसर्जन) आणि ११ ऑक्टोबर २०२६ (घटस्थापना) ते २० ऑक्टोबर २०२६ (दसरा) या कालावधीत डॉल्बी साऊंड सिस्टीम आणि उच्च आवाजाच्या ध्वनिवर्धकांचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे.
आरोग्यावर घातक परिणामांची दखल
डॉल्बी सिस्टीमच्या प्रचंड आवाजामुळे वृद्ध नागरिक, गरोदर महिला, लहान मुले, आजारी व्यक्ती आणि सामान्य नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच यामुळे ध्वनिकंपनामुळे मालमत्तेचे नुकसान होणे आणि शांतता भंग होण्याचा धोका असल्याने उच्च न्यायालयाच्या ध्वनिप्रदूषण नियंत्रण नियमांनुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
कायद्याचे उल्लंघन केल्यास गुन्हे दाखल होणार
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ (१) अंतर्गत हे निर्बंध लादण्यात आले आहेत. या आदेशाचा भंग करून डॉल्बी साऊंड सिस्टीम किंवा तत्सम उपकरणे भाड्याने देणे, पुरवणे किंवा वापरणे यावर पूर्णपणे बंदी असेल.
आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २२३ आणि इतर संबंधित कायद्यांनुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
