खर्डा:१७ सप्टेंबर २०२६
जिल्हा रुग्णालय, राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १० सप्टेंबर रोजी खर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित मोफत आरोग्य तपासणी, एनसीडी व कॅन्सर स्क्रीनिंग महाशिबिरात गुरुवारी वैद्यकीय प्रशासनाचा मोठा भोंगळ कारभार समोर आला.
शिबिराचे उद्घाटन लोकप्रतिनिधींच्या हस्ते दिमाखात झाले, मात्र उपचारासाठी आलेले तज्ज्ञ डॉक्टरच ऐनवेळी गायब असल्याने रुग्णांना दिवसभर अन्न-पाण्याविना ताटकळत राहावे लागले. प्रशासनाच्या या अकार्यक्षमतेमुळे रुग्णांनी व ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या शिबिराची पूर्वकल्पना देऊन परिसरातील शेकडो रुग्णांना उपचारासाठी बोलावण्यात आले होते. परंतु, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि जिल्हा शासकीय रुग्णालय यांच्यात समन्वय नसल्याने तज्ज्ञ डॉक्टर वेळेवर पोहोचलेच नाहीत. आरोग्य केंद्रात मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने उपचारासाठी आलेल्या रुग्णांची मोठी हेळसांड झाली.
रुग्णांनी या ढिसाळ कारभाराबाबत थेट जिल्हा शल्यचिकित्सकांशी संपर्क साधून तक्रार नोंदवली. याची दखल घेत कामात हलगर्जीपणा करणाऱ्या दंतरोग तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ आणि कॅन्सर डायग्नोस्टिक विभागाच्या संबंधित डॉक्टरांना तात्काळ कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून त्यांच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते अभिजीत चव्हाण व आकाश पवार यांनी खर्डा पोलीस ठाण्यात निवेदन दिले आहे.
निष्काळजीपणा करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर आणि केवळ सोशल मीडियावर ‘स्टेटस’ ठेवण्यापुरते शिबिराचे उद्घाटन करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
डॉक्टरांअभावी गैरसोय झाली!
“जिल्हा रुग्णालयाकडून आलेल्या कर्करोग व एनसीडी आरोग्य शिबिराचे आयोजन वरिष्ठांच्या सूचनेनुसारच केले होते. वेळेत उद्घाटन झाले, परंतु जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर वेळेवर उपस्थित राहू न शकल्याने रुग्णांची गैरसोय झाली.”
— डॉ. ओंकार जाधव (वैद्यकीय अधिकारी, खर्डा)
