जामखेड:१७ सप्टेंबर २०२६
मोहा शिवारातील ‘लक्ष्मी सांस्कृतिक कला केंद्र’ येथे बैठक न लावल्याच्या कारणावरून तब्बल ७ जणांच्या टोळक्याने पान टपरी चालक आणि कला केंद्रातील महिलेला बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात ऋषी गायकवाड, नदीम सय्यद, अमोल पिसाळ, विशाल मगर, गणेश चव्हाण, उमेर बारुद आणि हरी अशा सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ११ सप्टेंबर रोजी रात्री १२:५० वाजताच्या सुमारास फिर्यादी अभिषेक गुलचंद अंधारे (वय २४, रा. मिलिंदनगर, जामखेड) हे आपल्या पान टपरीत असताना आरोपींनी तेथे येऊन ‘बैठक लावा’ अशी मागणी केली. मात्र रात्री १ वाजता कला केंद्र बंद करण्याची वेळ झाल्याने अभिषेक यांनी बैठक लावण्यास स्पष्ट नकार दिला. याचाच राग धरून आरोपी गणेश चव्हाण, विशाल मगर आणि नदीम सय्यद यांनी अभिषेक यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
दरम्यान, भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या निशा उत्तम जाधव या महिलेला ऋषी गायकवाड, नदीम सय्यद आणि विशाल मगर यांनी बेदम मारहाण केली. आरोपी नदीम सय्यद याने कटरने निशा जाधव यांच्या दोन्ही हातांवर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. याच वेळी विशाल मगर याने त्यांच्या गळ्यातील ५४ हजार रुपये किमतीचे ६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे लॉकेट जबरदस्तीने हिसकावून पळ काढला.
मारहाणीनंतर आरोपींनी कला केंद्रातील खोल्यांच्या काचा आणि खुर्च्यांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. “परत नादी लागलात तर जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी देऊन परिसरात दहशत पसरवत आरोपी पसार झाले.
फिर्यादी अभिषेक गुलचंद अंधारे याच्या तक्रारीवरून जामखेड पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या विविध कलमांनुसार (११५(२), ११८(१), ११९(१), १८९(२), १९०, १९१(२), १९१(३), ३२४(४), ३५१(२), ३५२) गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश आघाव करत आहेत.
