पाथर्डी (अहिल्यानगर):२४ सप्टेंबर २०२६
पाथर्डी तालुक्यातील जांभळी गावच्या शिवारात कपाशीच्या पिकात बेकायदेशीरपणे लावलेल्या गांजाच्या शेतीवर स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि पाथर्डी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत छापा टाकला. या कारवाईत ११ किलो ६०० ग्रॅम वजनाची आणि २ लाख ३२ हजार रुपये किमतीची गांजाची ५ झाडे जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी सराईत गुन्हेगार किशोर बन्सी जायभाये (वय ३९, रा. येळी, ता. पाथर्डी) याला ताब्यात घेण्यात आले आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक २४ सप्टेंबर रोजी पाथर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर असताना, जांभळी शिवारातील एका शेतात कपाशीच्या आड गांजाची झाडे लावल्याची गुप्त माहिती पथकाला मिळाली.
स्थानिक गुन्हे शाखा आणि पाथर्डी पोलिसांनी पंचांसमक्ष तात्काळ सदर शेताची पाहणी केली असता, कपाशीच्या पिकात गांजाची लहान-मोठी ५ झाडे आढळून आली. पोलिसांनी तात्काळ २ लाख ३२ हजार रुपयांचा गांजा जप्त करत आरोपी किशोर जायभाये याला ताब्यात घेतले. या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात ‘एनडीपीएस’ (NDPS) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तडीपार अन् फरार आरोपी जाळ्यात:
ताब्यात घेतलेल्या किशोर जायभाये याच्या गुन्हेगारी अभिलेखाची पडताळणी केली असता, तो पाथर्डी पोलीस ठाण्यातील एका गंभीर गुन्ह्यात फरार असल्याची माहिती समोर आली. तसेच, तो सराईत गुन्हेगार असून त्याला उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी ३० जानेवारी २०२४ पासून दोन वर्षांसाठी अहिल्यानगर जिल्हा आणि बीड जिल्ह्यातील शिरूर व आष्टी तालुक्यातून तडीपार (हद्दपार) केले होते. तडीपारीचा आदेश मोडून तो जिल्ह्यात बेकायदेशीरपणे वावरत गांजाची शेती करत असल्याचे या कारवाईमुळे उघडकीस आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखा व पाथर्डी पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने केली.
