बीड प्रतिनिधी :25
वंचित बहुजन आघाडीच्या पक्ष संघटना बांधणीला वेग देण्यासाठी राज्य कार्यकारी सदस्यांवर जिल्हानिहाय व लोकसभा क्षेत्रनिहाय जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. त्याअंतर्गत बीड लोकसभा क्षेत्राच्या संघटना बांधणीची महत्त्वपूर्ण जबाबदारी राज्य कार्यकारी सदस्य ॲड. अरुण जाधव यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
याबाबत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे आणि प्रदेश सरचिटणीस प्रा. सोमनाथ साळुंके यांनी अधिकृत पत्राद्वारे नियुक्ती जाहीर केली आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बीड लोकसभा क्षेत्रात बूथ कमिट्या, ग्राम शाखा, सर्कल, तालुका आणि जिल्हास्तरावरील संघटन मजबूत करणे, सदस्य नोंदणी वाढविणे तसेच विविध आघाड्यांची प्रभावी यंत्रणा उभारणे, या दृष्टीने ॲड. अरुण जाधव यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
ॲड. अरुण जाधव हे वंचित बहुजन आघाडीचे निष्ठावंत नेते म्हणून कार्यरत असून, जामखेड नगरपरिषद निवडणुकीत पक्षाला विजय मिळवून देण्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत त्यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवत आपला जनाधार दाखवून दिला होता.
अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड परिसरात पक्ष संघटन उभारणीचा अनुभव असलेल्या ॲड. जाधव यांना आता बीड लोकसभा क्षेत्राची जबाबदारी मिळाल्याने आगामी काळात बीड जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीच्या संघटनात्मक विस्ताराला वेग येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर दाखविलेला विश्वास लक्षात घेता, बीड जिल्ह्यात गावपातळीपासून लोकसभा क्षेत्रापर्यंत संघटनात्मक बांधणी करण्याचे मोठे आव्हान ॲड. अरुण जाधव यांच्यासमोर असणार आहे. या नियुक्तीमुळे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, बीडसोबतच हिंगोली, नाशिक, वाशिम-यवतमाळ, चंद्रपूर, अमरावती, नांदेड, बुलढाणा आणि गडचिरोली-चिमूर या लोकसभा क्षेत्रांसाठीही पक्षाकडून प्रभारींच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
