खर्डा / ६ ऑक्टोबर २०२६
दूध व दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळीला आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) खर्डा परिसरात एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे.
खर्डा जवळील नागोबाची वाडी येथे एका शेतात बेकायदेशीरपणे साठवून ठेवलेली तब्बल २,४०० किलो बनावट दूध पावडर प्रशासनाने जप्त करून जागीच नष्ट केली. या जप्त करण्यात आलेल्या साठ्याची एकूण किंमत ५ लाख २७ हजार ५६० रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अन्नसुरक्षा अधिकारी प्रदीप पवार यांच्यासह अहिल्यानगर आणि नाशिक येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाने दिनांक २९ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास नागोबाची वाडी येथील अमृतलिंग मंदिराजवळील एका शेतात छापा टाकला.
या कारवाई दरम्यान पथकाला प्लास्टिकच्या २० किलो क्षमतेच्या तब्बल १२० विनालेबल पिशव्या आढळून आल्या. या सर्व पिशव्यांमध्ये बनावट दूध पावडर भरलेली होती.
या साठ्याबाबत रामदास भानुदास गोपाळघरे (वय २८, रा. नागोबाची वाडी) याची कसून चौकशी करण्यात आली असता अनेक धक्कादायक व गंभीर बाबी समोर आल्या. साठवणूक करण्यात आलेली ही दूध पावडर थेट जमिनीवर अस्वच्छ वातावरणात ठेवली होती, तसेच वरून छताचे पाणीही त्यावर गळत होते. या व्यतिरिक्त गोपाळघरे याच्याकडे अन्न साठवणुकीचा किंवा विक्रीचा कोणताही वैध परवाना (License) नव्हता. खरेदी-विक्रीचा कोणताही अधिकृत अभिलेख किंवा बिल तो अधिकाऱ्यांसमोर सादर करू शकला नाही.
नेटवर्क नसताना ऑफलाइन पंचनामा; जेसीबीने साठा केला नष्ट:
छापा टाकलेल्या घटनास्थळी मोबाईल नेटवर्क उपलब्ध नसल्याने अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ ऑफलाइन पद्धतीने सर्व कायदेशीर पंचनामा पूर्ण केला. प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी या पावडरचा २ किलोचा नमुना घेण्यात आला आहे.
तपासणीचा अहवाल येईपर्यंत हा साठा सुरक्षित ठेवण्यास संबंधित मालकाने असमर्थता दर्शवली. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा धोका लक्षात घेता अधिकाऱ्यांनी जेसीबीच्या साहाय्याने खड्डा खोदून सर्व २,४०० किलो बनावट दूध पावडर जागीच गाडून नष्ट केली.
याप्रकरणी अन्नसुरक्षा अधिकारी प्रदीप पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी रामदास भानुदास गोपाळघरे याच्याविरुद्ध खर्डा पोलिस ठाण्यात अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यांतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या या धाडसी कारवाईमुळे जामखेड तालुक्यातील भेसळ करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
