खर्डा (विशेष प्रतिनिधी):१३ सप्टेंबर २०२६
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲपवर (WhatsApp) मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या फोटोवर आक्षेपार्ह मजकूर आणि इमोजी टाकून जातीय द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सतेवाडी (ता. जामखेड) येथील तरुणाला खर्डा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विठ्ठल बापू तोंडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
नायगाव (ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) येथील रहिवासी विकास युवराज शिंदे (वय २५) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ११ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी विठ्ठल तोंडे याने व्हॉट्सॲप स्टेटसवर मनोज जरांगे पाटील यांचा फोटो ठेवून त्यावर हसणारे इमोजी आणि आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला होता. याबाबत विचारणा केली असता, आरोपीने ‘माझी मर्जी, मी काहीही करेन’ असे उर्मट उत्तर दिले.
रविराज साबळे आक्रमक; रात्री उशिरापर्यंत ठाण मांडून दाखल करवून घेतला गुन्हा
या घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते रविराज साबळे यांनी नायगाव ग्रामस्थांसह खर्डा पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी मध्यरात्री १ वाजेपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये थांबून घटनेचा तीव्र निषेध केला आणि आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली. त्यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर पोलिसांनी तत्परतेने गुन्हा दाखल केला. या सहकार्याबद्दल समस्त नायगाव ग्रामस्थांच्या वतीने रविराज साबळे यांचे विशेष आभार मानण्यात आले.
विकास शिंदे यांच्या फिर्यादीवरून खर्डा पोलीस ठाण्यात (FIR No. 0159/2026) भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३५३(२) व ३५६ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. खर्डा पोलिसांनी १२ सप्टेंबर रोजी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास जामखेड हद्दीतून आरोपी विठ्ठल तोंडे याला अटक केली.
सदर कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वलसिंह राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल संभाजी शेंडे आणि पोलीस कॉन्स्टेबल मस्के यांनी केली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल क्षीरसागर करत आहेत.
