खर्डा (प्रतिनिधी):१३ सप्टेंबर २०२६
डोळ्यात तिखट फेकून कोयत्याने वार करत माळेवाडी (जि. धाराशीव) येथील तान्हाजी भास्कर बोराडे यांची हत्या करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवघ्या दोन दिवसांत पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी मुख्य आरोपीसह तीन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, खर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
दिनांक ११ सप्टेंबर २०२६ रोजी खर्डा (ता. जामखेड) येथे तान्हाजी बोराडे हे जात असताना, मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी अचानक त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली. त्यानंतर काही समजण्याच्या आतच त्यांच्या डोक्यात कोयत्याने भीषण वार करून त्यांना ठार मारण्यात आले. याप्रकरणी खर्डा पोलीस ठाण्यात बीएनएस कलम १०३(१), ३(५) अन्वये ना-उघड खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पुणे आणि राहुरीतून आरोपींना बेड्या
घटनेचे गांभीर्य ओळखून अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाचे आदेश दिले. एलसीबीचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि विकास जाधव आणि त्यांच्या पथकाने गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला.
तपासादरम्यान हा खून प्रसाद अशोक अडागळे आणि त्याच्या ३ अल्पवयीन साथीदारांनी केल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. आरोपींचा माग काढत पथकाने थेट पुणे गाठून एका १७ वर्षीय अल्पवयीन बालकाला ताब्यात घेतले. तर, उर्वरित आरोपी टाकळीमिया (ता. राहुरी) येथे असल्याची माहिती मिळताच तिथे छापा टाकून प्रसाद अशोक अडागळे (वय १८) आणि इतर दोन अल्पवयीन बालकांना (वय १६ व १७) ताब्यात घेतले.
ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व आरोपींना पुढील तपासासाठी खर्डा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोउपनि विकास जाधव आणि अंमलदार शाहीद शेख, अभिजीत अरकल, शामसुंदर जाधव, भाऊसाहेब काळे, अमोल आजबे, अजिनाथ पाखरे, रमीजराजा आत्तार, अरूण मोरे, फुरकान शेख व प्रशांत राठोड यांच्या पथकाने केली.
