अहिल्यानगर:८ सप्टेंबर २०२६
जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात अहिल्यानगर पोलीस प्रशासनाने मोठी मोहीम उघडली असून स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने कोपरगाव आणि श्रीरामपूर शहरात छापे टाकून बेकायदेशीर गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त केली आहे. या कारवाईत दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून पोलिसांनी एकूण ५२,४१६ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून ५ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथके तयार करून श्रीरामपूर व कोपरगाव भागात माहिती गोळा करण्यात आली. ७ सप्टेंबर रोजी पथकाने दोन्ही शहरांत अचानक छापे टाकून ही धडक कारवाई केली.
श्रीरामपूर शहर: श्रीरामपूर हद्दीतील कारवाईत २२,९१६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात अजय बरल कन्नाके (वय ४८, रा. श्रीरामपूर) याला ताब्यात घेण्यात आले असून, संदीप पापडीवाल व जिशान शेख (दोघे रा. श्रीरामपूर) हे दोन आरोपी फरार झाले आहेत. श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोपरगाव शहर: कोपरगाव हद्दीतील छाप्यात २९,५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी रोहित बबन जंजिरे (वय २९, रा. अंबिकानगर, कोपरगाव) याला अटक करण्यात आली असून, माल पुरवणारा रतन जाधव (रा. नाशिक) हा पसार झाला आहे. कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, सुनील पवार, गणेश धोत्रे, अजिनाथ पाखरे, विशाल तनपुरे, रमीजराजा आतार, निळकंठ कारखेले, अरुण गांगुर्डे, रणजित जाधव, प्रकाश मांडगे आणि मनोज साखरे यांच्या पथकाने केली. पोलीस सध्या फरार आरोपींचा शोध घेत आहेत.
