जामखेड (प्रतिनिधी):१५ सप्टेंबर २०२६
गणेशोत्सवाचा आनंद आणि उत्साहाचे वातावरण असतानाच जामखेड तालुक्यातील मतेवाडी (जवळा) येथे एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. सोमवारी (दि. १४ सप्टेंबर) श्रीगणेश स्थापनेच्याच दिवशी ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडून देवांश सचिन मते या अवघ्या सव्वा वर्षाच्या चिमुकल्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. मते कुटुंबातील एकुलत्या एक मुलाचा असा अचानक अंत झाल्याने मतेवाडीसह संपूर्ण जवळा परिसरावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देवांशचे वडील सचिन सुग्रीव मते हे शेतातील मका कुट्टीचे काम उरकून ट्रॅक्टर घेऊन घरी परतले होते. अंगणात ट्रॅक्टर उभा केल्यानंतर लहानगा देवांश खेळता खेळता अचानक ट्रॅक्टरजवळ कसा गेला, हे कोणाच्याही लक्षात आले नाही. ट्रॅक्टरच्या हालचालीदरम्यान देवांश नकळत मागील चाकाखाली आला आणि गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच प्राण गेला.
गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या भीषण अपघातामुळे आनंदाच्या वातावरणाचे काही क्षणांतच तीव्र दुःखात रूपांतर झाले. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी व नातेवाईकांनी मते यांच्या घराकडे धाव घेतली. एकुलत्या एक चिमुकल्याच्या अशा निघून जाण्याने मते कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून या घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे.
