कर्जत / अहिल्यानगर:५ सप्टेंबर २०२६
गर्दीचा फायदा घेऊन महिला प्रवाशाचे सोन्याचे दागीने चोरणाऱ्या बीड येथील सराईत टोळीचा अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून ६ लाख ७५ हजार रुपये किमतीचे ४५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण जप्त केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २७ ऑगस्ट २०२६ रोजी फिर्यादी अयोध्या दिगंबर कोरडे (वय ६२, रा. शिक्षक कॉलनी, कर्जत) या कर्जत बस स्थानकातून जामखेडला जाण्यासाठी एसटी बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लांबवले होते. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०३ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास करत असताना ३ सप्टेंबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळाली की, हा गुन्हा परशुराम मल्हारी गायकवाड (रा. बीड) याने आपल्या महिला साथीदारांसह केला असून ते मिरजगाव बस स्थानक परिसरात आले आहेत. या माहितीच्या आधारे पथकाने तातडीने सापळा रचून खालील आरोपींना ताब्यात घेतले:
१) परशुराम मल्हारी गायकवाड (वय ४५, रा. सुभाष कॉलनी पेठ, बीड)
२) लक्ष्मी संजय लोखंडे (वय ५९, रा. मोहटादेवी मंदिराच्या मागे, वडवणी, जि. बीड)
३) पुजा विशाल मोहिते (वय २७, रा. नाळवंडी नाका, शास्त्रीनगर, बीड)
आरोपींकडे अधिक चौकशी केली असता, त्यांनी ही चोरी कौसाबाई सर्जेराव गायकवाड (रा. गांधीनगर, बीड – सध्या फरार) हिच्या मदतीने केल्याची कबुली दिली.
नातेवाईकाकडून मुद्देमाल जप्त
मुख्य आरोपी परशुराम गायकवाड याने चोरीचे काही दागिने आपल्या नातेवाईकाकडे ठेवल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी पंचांसमक्ष ६,७५,००० रुपये किमतीचे ४५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण जप्त केले आहे. आरोपींना जप्त मुद्देमालासह पुढील तपासासाठी कर्जत पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
ही कारवाई अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलीस अंमलदार श्यामसुंदर जाधव, प्रताप देवकाते, अमोल कोतकर, मनोज साखरे, योगेश कर्डीले, महादेव भांड, फुरकान शेख, प्रशांत राठोड व ज्योती शिंदे यांच्या पथकाने केली.
