श्रीगोंदा प्रतिनिधी | १३ ऑगस्ट २०२६
श्रीगोंदा : धमकावून आणि मारहाण करून मोबाईलमधील फोन पे ॲपद्वारे २ हजार रुपये जबरदस्तीने ट्रान्सफर करून घेणाऱ्या दोन संशयित आरोपींना श्रीगोंदा पोलिसांनी २४ तासांच्या आत ताब्यात घेतले. राम राजेंद्र माने (वय २८, रा. कर्जत) आणि बबलू शामराव पिटेकर (वय ३०, रा. काष्टी, ता. श्रीगोंदा) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० ऑगस्ट रोजी सायंकाळी सातच्या सुमारास फिर्यादी कोल्हापूरहून दौंड-अहिल्यानगर मार्गाने लोणी व्यंकनाथ शिवारातून जात होते. त्यावेळी अज्ञात व्यक्तींनी त्यांना रस्त्यात अडवून गंभीर धमकी दिली आणि मारहाण केली.
त्यानंतर आरोपींनी फिर्यादीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला. मोबाईलमधील फोन पे खात्याद्वारे स्वतःच्या खात्यावर २ हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करून घेत आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील जबरी चोरी व खंडणीसंदर्भातील कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शोध पथक तयार करण्यात आले. पथकाने सायबर सेलच्या मदतीने संबंधित बँक खाते आणि फोन पे क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण केले. तसेच स्थानिक गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन्ही संशयित आरोपींना ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान आरोपींनी पैशांच्या आमिषापोटी फिर्यादीला धमकावून फोन पेवरून २ हजार रुपये जबरदस्तीने ट्रान्सफर करून घेतल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. गुन्ह्यात वापरलेला मोबाईल आणि डिजिटल व्यवहारासंदर्भातील पुरावे पोलिसांनी जप्त केले आहेत.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या देखरेखीखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन लिमकर, रसूल शेख आणि पुष्कर कडू यांनी तपासात सहभाग घेतला.
तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल अविनाश काटकर, पोलीस कॉन्स्टेबल अरुण पवार, वैजिनाथ कुटे, मयूर तोरडमल, देविदास पळसे आणि राहुल मोढळे, चालक साळवे तसेच महिला पोलीस कॉन्स्टेबल गीतांजली लाड यांच्या पथकाने ही धडाकेबाज कारवाई केली.
आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून, गुन्ह्याचा पुढील तपास श्रीगोंदा पोलीस करीत आहेत.
