कर्जत-जामखेड प्रतिनिधी | १२ ऑगस्ट २०२६
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर कर्जत आणि जामखेड तालुक्यांत उद्या, १३ ऑगस्ट रोजी विविध ठिकाणी भव्य तिरंगा रॅलींचे आयोजन करण्यात आले आहे. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत या रॅली पार पडणार आहेत.
कर्जत तालुक्यातील राशीन येथे सकाळी ९.३० वाजता भव्य तिरंगा पायी रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीत प्रा. राम शिंदे सहभागी होणार आहेत. त्यानंतर सकाळी १०.४५ वाजता कर्जत शहरात भव्य तिरंगा मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले असून, त्यातही सभापती प्रा. राम शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
जामखेड येथे दुपारी ३ वाजता भव्य तिरंगा दौड रॅली आयोजित करण्यात आली आहे. या रॅलीत नागरिक, युवक, विद्यार्थी, विविध संस्था-संघटनांचे पदाधिकारी तसेच देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
या रॅलींच्या माध्यमातून नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना दृढ करण्यासोबतच तिरंग्याप्रती सन्मान आणि राष्ट्राभिमान जागविण्याचा संदेश दिला जाणार आहे. ‘हर घर तिरंगा’ आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कर्जत-जामखेड परिसरातील नागरिकांनी रॅलींमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन तिरंग्याचा सन्मान राखत राष्ट्रभक्तीचा जागर करावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
