अहिल्यानगर, 14 ऑगस्ट 2026:
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचनेनुसार जिल्हा वाहतूक शाखेने आज दुपारी 12 ते 2 या वेळेत शहरात विशेष मोहीम राबवून मोठी कारवाई केली. DSP चौकात आणि शहरातील विविध चौकांत लावण्यात आलेल्या नाकाबंदी दरम्यान केंद्रीय मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या 152 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
यामध्ये बेकायदेशीरपणे काळ्या काचा अथवा ब्लॅक फिल्म लावून फिरणाऱ्या 56 चारचाकी वाहनांवर विशेष कारवाई करण्यात आली. संबंधित वाहनांवरील काळी फिल्म जागीच काढून त्यांच्यावर दंड आकारण्यात आला.
ही धडक मोहीम पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा व शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक महेश पाटील आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या राबवली.
शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आणि नियमभंगाला आळा घालण्यासाठी अशा विशेष मोहिमा पुढेही सुरू राहतील, असे वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
