अहिल्यानगर:३० ऑगस्ट २०२६
मिरजगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) विजय झंजाड आणि पोलीस कर्मचारी सुनील खैरे यांच्या विरोधा , जातीवाचक शिवीगाळ व अधिकाराचा गैरवापर केल्याप्रकरणी तत्काळ प्रथम खबरी अहवाल (FIR) नोंदवून कडक कारवाई करण्याची मागणी अहिल्यानगरच्या पोलीस अधीक्षक (ग्रामीण) यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाभूळगाव (ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) येथील रहिवासी सौ. सारिका बाबासाहेब चव्हाण (वय २८, जात: पारधी) यांनी ही तक्रार दाखल केली आहे.
काय आहे नेमका घटनाक्रम?
तक्रारीत नमूद केल्यानुसार, २२ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २:०० वाजता अर्जदार सौ. सारिका चव्हाण या आपल्या कुटुंबासह नातेवाईकांतील मुलांना भेटण्यासाठी आणि चौकशी करण्यासाठी मिरजगाव पोलीस ठाण्यात गेल्या होत्या. त्यावेळी तेथे ड्युटीवर असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड आणि पोलीस कर्मचारी सुनील खैरे यांनी त्यांच्याशी अत्यंत उद्धट व अरेरावीची भाषा वापरली.
तसेच, अर्जदार महिला असतानाही त्यांच्याशी अशोभनीय गैरवर्तन केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
अर्जदार हे पारधी समाजाचे आहेत हे माहीत असतानाही, दोन्ही अधिकाऱ्यांनी त्यांना जाणीवपूर्वक हीन दर्जाची जातीवाचक शिवीगाळ केली आणि सार्वजनिक ठिकाणी अपमान, दमदाटी व पदाचा गैरवापर करून धमकावल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल, अकाउंट बॅन झाल्याचा आरोप;
या घटनेनंतर सारिका चव्हाण यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत आपल्यावर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचला होता. या व्हिडिओ नंतर त्यांना नागरिकांकडून मोठा पाठिंबा मिळाला.
मात्र, अन्यायाविरुद्ध आवाज उठवल्यामुळे आणि नागरिकांचा पाठिंबा वाढू लागल्यामुळेच आपले इन्स्टाग्राम सोशल मीडिया अकाउंट बॅन (सस्पेंड) करण्यात आल्याचा गंभीर आरोप सारिका चव्हाण यांनी केला आहे.
प्रशासन आणि पोलिसांकडून योग्य दाद मिळत नसल्याचे पाहून त्यांनी विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्याकडे न्यायाची आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
