नेवासा (प्रतिनिधी):२ सप्टेंबर २०२६
‘नशामुक्त अहिल्यानगर’ अभियानाअंतर्गत नेवासा पोलिसांनी ड्रग्जविरोधात मोठी कारवाई करत गांजाची शेती आणि सुकवलेला गांजा असा एकूण १७० किलोचा साठा जप्त केला आहे. अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार ही धडक कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या पथकाने ३१ ऑगस्ट २०२६ रोजी वडुले गावच्या शिवारात छापा टाकला. तेथील शेतमालक बबन शंकर देशमुख (वय ६०) याने आपल्या शेतात गांजाची झाडे लावून, ती वाळवून विक्रीचा धंदा सुरू केला होता. पोलिसांनी पंचांसमक्ष कारवाई करत शेतातील ४० ते ५० जिवंत गांजाची झाडे आणि सुकवलेला गांजा असा एकूण १७० किलोचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी एनडीपीएस (NDPS) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक वाकचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (शेवगाव) राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, पीएसआय विकास पाटील, अंमलदार काळोखे, वाघमोडे, शेळके, गाजरे, बर्डे, अप्पा वैद्य, गवळी, वाघ, नारायण दमाळे, महिला पोलीस अंमलदार गीता पवार, सुमित करंजकर आणि होमगार्ड सांगळे यांच्या पथकाने केली.
पोलीस प्रशासन तर्फे आवाहन:
“नागरिकांना ड्रग्ज किंवा अंमली पदार्थांविषयी काहीही माहिती मिळाल्यास त्यांनी तात्काळ ‘डायल ११२’ किंवा नेवासा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाईल. चला, सर्वांनी मिळून नशामुक्त नेवासा घडवूया!”
— प्रताप दराडे (पोलीस निरीक्षक, नेवासा)
