खर्डा: 27 ऑगस्ट 2026
जामखेड तालुक्यातील खर्डा हद्दीतील वाकी येथे हरिनाम सप्ताहानिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरवरील विठ्ठलाच्या प्रतिमेचा भाग अज्ञात व्यक्तीने फाडल्याची घटना गुरुवारी (दि. २७) पहाटे उघडकीस आली. महिनाभरापूर्वी याच गावातील विठ्ठल मंदिरातील मूर्तीची तोडफोड झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर पुन्हा विठ्ठलाच्या प्रतिमेचे बॅनर फाडण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.
वाकी येथे हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त विठ्ठल, श्रीकृष्ण व हनुमान यांच्या प्रतिमा असलेले बॅनर लावण्यात आले होते. बुधवारी मध्यरात्रीपासून गुरुवारी पहाटे सहा वाजेच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने बॅनरवरील विठ्ठलाच्या प्रतिमेचा गळ्याच्या भागापासून खालील भाग फाडल्याचे सकाळी निदर्शनास आले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. कर्जत जामखेड विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. तसेच डॉग स्क्वॉड आणि फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी पाहणी करून तपासाच्या दृष्टीने आवश्यक माहिती संकलित केली.
दरम्यान, सुमारे महिनाभरापूर्वी वाकी येथील विठ्ठल मंदिरातील मूर्तीची अज्ञात व्यक्तीने तोडफोड केली होती. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून तपास सुरू आहे. आता पुन्हा विठ्ठलाच्या प्रतिमेचे बॅनर फाडल्याने या दोन्ही घटनांचा काही संबंध आहे का, याबाबतही पोलिसांकडून तपास केला जात आहे.
घटनेनंतर गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असले तरी सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून गावात शांतता आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. दरम्यान, अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन घटनेचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
